उन्नाव: शेतात मूर्ती सापडल्याची बतावणी करत ग्रामस्थांची फसवणूक करणाऱ्या तरुणाला तुरुंगवास घडला आहे. हिंदू देवी देवतांच्या मूर्ती ऑनलाऊन मागवून त्या जमिनीत सापडल्याचा दावा तरुणानं केला. ही बातमी वणव्यासारखी गावात पसरली. मूर्ती पाहण्यासाठी संपूर्ण गाव जमला. ग्रामस्थांनी मूर्तींची पूजा सुरू केली. मूर्तींसमोर पैसे ठेवले. मात्र डिलिव्हरी बॉय आणि पोलिसांनी तरुणाचा पदार्फाश केला.

उन्नावमधील हसनगंज परिसरातील महमदपूर गावात रवी नावाचा तरुण राहतो. शेतात नांगरणी करताना जमिनीत काही मूर्ती सापडल्याचं त्यानं ग्रामस्थांना सांगितलं. ग्रामस्थांना हा चमत्कार वाटला. त्यांनी रवीवर विश्वास ठेवला. मूर्तींची पूजा करण्यासाठी, त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी संपूर्ण गाव लोटला. ग्रामस्थ मूर्तींची मनोभावे पूजा करून त्यांच्यासमोर दान म्हणून पैसे ठेवू लागले.
सात महिने पगार नाही, मग नोकरीवरून काढलं; कारखान्याबाहेर एकाचवेळी ७ कामगार विष प्यायले
पूजाअर्चा वाढल्यानंतर रवीनं मंदिर उभारण्याची योजना आखली. त्यानं या योजनेत संपूर्ण कुटुंबाला सामील करून घेतलं. ग्रामस्थ मूर्तींसमोर मोठ्या प्रमाणात दान ठेवत असल्यानं पैशांचा प्रश्न नव्हता. मात्र मंदिराचं काम सुरू होण्याआधी पोलिसांची एंट्री झाली. पोलिसांच्या मदतीला गोरेलाल होता. गोरेलाल एका कुरियर कंपनीत काम करतो.

रवीनं ज्या मूर्ती शेतात सापडल्याचा दावा केला, त्या प्रत्यक्षात ऑनलाईन मागवण्यात आल्याची माहिती गोरेलालनं पोलिसांना दिली. रवीनं फक्त १६९ रुपयांत मूर्ती मागवल्या होत्या. ग्रामस्थ मूर्तींची पूजा करत असताना पोलिसांनी रवी, त्याचा भाऊ विजय आणि वडील अशोक यांना ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर रवीनं सत्य सांगितलं.
डॉक्टर घरी पूजा करत राहिले; आरोग्य केंद्राबाहेर चिमुकल्यानं आईच्या कुशीत प्राण सोडले
आपल्या शेत जमिनीत काहीतरी आहे असं स्वप्न पडलं. त्यामुळे शेतात खोदकाम केलं. तर देवी देवतांच्या मूर्ती सापडल्या, अशी बतावणी अशोक आणि त्याची मुलं दोन दिवसांपासून करत होती. ग्रामस्थांनीदेखील त्यांच्यावर विश्वास ठेवला, अशी माहिती बांगरमऊचे पोलीस अधिकारी पंकज कुमार सिंह यांनी दिली. ग्रामस्थांचा प्रतिसाद पाहता मंदिर उभारण्याची योजना आरोपींनी आखली. मात्र त्या मूर्ती ऍमेझॉनवरून मागवण्यात आल्याचं चौकशीत समोर आलं. त्यानंतर ग्रामस्थांना खरा प्रकार सांगण्यात आला, असा घटनाक्रम सिंह यांनी कथन केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here