‘ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची…’पासून ‘लालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात..’पर्यंत विविध श्रीगणेशाचा जय-जयकार करणारी भक्तिगीते लालबागमधील रस्त्यांवर, गल्लीत, वाडीत ऐकू येत आहेत. गेली दोन वर्षे करोना निर्बंधांमध्ये अडकलेला हा परिसर आज मोकळा श्वास घेताना दिसतोय. यंदाच्या उत्सवाचं स्वरूप कसं असेल? याविषयी सर्वांच्याच मनात धाकधूक होती. पण, ‘लालबागचा राजा’च्या गाभाऱ्यात उभे राहून मागे वळून पाहिल्यास ओसंडून वाहणारा भक्तांचा जनसागर पाहिल्यावर ‘ही शान कुणाची…’ असं आपसूकच तोंडी येते. मुंबईचा राजा अशी ख्याती असलेल्या गणेशगल्लीतील भव्य विश्वकर्मारूपी बावीस फुटी गणेशमूर्तीचे रूप भुरळ पाडते. शेजारी असलेला तेजुकाया मेन्शनची कागद्याच्या लगद्यापासून बनलेली पर्यावरणपुरक मूर्ती नव्या परंपरेची मुहूर्तमेढ रचत आहे.

गणेशगल्लीची भव्यता

दोन वर्षांच्या खंडानंतर लालबाग-परळमध्ये दिमाखात गणेशोत्सव साजरा होत आहे. परिणामी, उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून सार्वजनिक मंडळांच्या मंडपात गणेशभक्तांची गर्दी होत आहे. गणेशोत्सवाची पंढरी समजल्या जाणाऱ्या या गणेशनगरीत कित्येक मंडळांची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात झाली आहे. त्यामुळेच मोठ्या अभिमानाने आपल्या मंडळाचे वेगळेपण त्यांनी पंचाहत्तरीनंतर देखील टिकवून ठेवले आहे. गणेशगल्लीच्या मंडळाने १९७७ साली सुवर्ण महोत्सवी वर्षात भारतातील पहिली २२ फूट उंच मूर्ती निर्माण केली व लालबागचे नाव जगविख्यात केले. ‘भव्यतेची परंपरा व संस्कृतीची जोपासना’ हे मंडळाचे ब्रीदवाक्य लालबाग-परळमधील प्रत्येक नव्या-जुन्या मंडळाच्या कर्तृत्वाची साक्ष देत आहे.

लोकप्रिय ‘लालबागचा राजा’, ‘चिंतामणी’

गणेशोत्सवाबद्दल लिहिताना चिंचपोकळीच्या चिंतमाणीचे नाव आवर्जून घेतले जाते. याचे कारण म्हणजे, हे मंडळ मुंबईत स्थापन झालेले दुसरे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. चिंतामणीची मोहक मूर्ती पाहताना भक्त तल्लीन होतात. दुसरीकडे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले ‘लालबागचा राजा’ हे देशातील सर्वांत लोकप्रिय सार्वजनिक गणेश मंडळापैकी एक आहे. दोन वर्षांच्या निर्बंधांच्या अल्पविरामानंतर लालबागची गणेशनगरी बहरली आहे. हे दहा दिवस ही नगरी झोपत नाही. परळचे नरे पार्क मैदान असो किंवा लालबागमधील वाडी असो येथे खाद्यपदार्थांचे स्टॉल रात्रभर खुले असतात. शहराच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचे मन बाप्पाच्या दर्शनाने भरते आणि पोट खाऊ गल्लीत. विशेष म्हणजे विभागातील सुशिक्षित तरुणांनी ही दुकाने थाटली आहेत.

तेजुकाया आणि परळचा महाराजा

गणेशोत्सवातील एकी

‘आनंदाला नाही तोटा’ असे म्हणत उत्सवदिनी एकत्र येणारी तेजुकाया मेन्शन आजच्या विभक्त कुटुंबपद्धतीच्या काळात एकजुटीचे साक्ष देते. चार-पाच वर्षांपूर्वी तेजुकाया मेन्शन वसाहत पुनर्विकासाठी तोडण्यात आली. त्यामुळे सर्व रहिवासी इतरत्र राहण्यास गेले. पण, गणेशोत्सवाच्या निमित्ताने हे रहिवासी मंडळाच्या मंडपात एकत्र येतात. कार्यकर्ते नोकरी सांभाळून हजेरी लावतात. रात्रभर मंडळाचे काम करतात आणि मग सकाळी आपापल्या घरी जाऊन पुढे नोकरीला निघतात. काही कार्यकर्ते नोकरीच्या वेळा बदलून घेतात व सकाळीच मंडळाची कामे करतात. अनुभवी ज्येष्ठ रहिवासी आणि महिला वर्गही मुंबईच्या कानाकोपऱ्यातून गणपतीसाठी येतात. बाप्पाचे घर हे आता त्यांचेच घर बनले आहे.

काळाचौकीचा महागणपती

गिरणगावची ओळख

मुंबईच्या सुतगिरणीचा बालेकिल्ला असलेला, प्रामुख्याने गिरणगाव म्हणून ओळखला जाणारा हा परिसर. आज या परिसरात गिरण्यांचे अवशेष आणि चिमण्या उरल्या असल्या तरी मिल कामगारांची तिसरी-चौथी पिढी नेटाने विभागातील विविध मंडळांमध्ये कार्यरत आहे. मुंबईचा राजा गणेशगल्ली, लालबागचा राजा, रंगारी बदक चाळ, तेजुकाया, काळाचौकीचा महागणपती, चिंचपोकळीचा चिंतामणीपासून परळकडील परळचा राजा नरेपार्क, लाल मैदान, लक्ष्मी कॉटेज, कृष्णनगर, पोस्टगल्ली, बीआयटी परिसरातील परळचा महाराजा आदी सर्व मंडळांचे मंडप भाविकांनी फुलून गेले आहेत. पुढील सात-आठ दिवसांत हा जनसागर अधिकच ओसंडून वाहणार असल्याची चिन्हे आहेत. दुपारी परळ, प्रभादेवी रेल्वेस्थानकावर उतरायचे, विभागातील एकेक गणपती पाहून दक्षिण मुंबईचा फेरफटका मारत रात्र जागवायची आणि पहाटेची ट्रेन पकडून परतीचा प्रवास अशी या भक्तगणांची रोजनिशी असते. परतीच्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर नवचैतन्य पसरलेले असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here