Maharashtra Politics | काँग्रेसमधील काही आमदार फुटणार असून ते शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. यात काही माजी मंत्र्यांचा समावेश असल्याचे बोलले जात होते. त्यातच चव्हाण आणि फडणवीस यांच्या भेटीच्या चर्चा रंगू लागल्या. फक्त अशोक चव्हाणच नव्हे तर काँग्रेसचे एकूण ७ आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत. हे सर्वजण लवकरच काँग्रेसला अलविदा करून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

 

Sonia Gandhi Rahul Gandhi
सोनिया गांधी आणि राहुल गांधी

हायलाइट्स:

  • सात आमदार काँग्रेसमुक्त होण्याच्या तयारीत
  • महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नव्या भूकंपाची नांदी
  • अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा
मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरुद्धच्या बंडानंतर परिस्थिती जरा कुठे निवळत नाही तोच आता महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षातील काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे काही बडे नेते भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्यासाठी इच्छूक असल्याची वदंता होती. परंतु, त्यावर दोन्ही बाजूंनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र, गुरुवारी संध्याकाळी काँग्रेस (Congress) नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमुळे आता काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, फक्त अशोक चव्हाणच नव्हे तर काँग्रेसचे एकूण ७ आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत. हे सर्वजण लवकरच काँग्रेसला अलविदा करून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का? पक्ष सोडणार का? आझादांची भेट का? थेट प्रश्नांना पृथ्वीराजबाबांची रोखठोक उत्तरं
सध्याच्या घडीला राज्यात काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, यापैकी ७ आमदार भाजपमध्ये जाण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. बऱ्याचकाळापासून हे आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले जाते. यात एका माजी मुख्यमंत्र्यांसह ४ माजी मंत्र्यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता काँग्रेसचे हे ७ आमदार कोण, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची गुरुवारी संध्याकाळी भेट झाल्याची माहिती आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय वाटाघाटी झाल्या असण्याचा अंदाज आहे. भाजप नेते आशिष कुलकर्णी यांच्या घरी गणेश दर्शनाच्या निमित्ताने फडणवीस-चव्हाणांची भेट झाली. शिवसेना, काँग्रेस ते भाजप असा सर्वव्यापी प्रवास असलेले आशिष कुलकर्णी यांची नुकतीच मुख्यमंत्री कार्यालयात समन्वयक म्हणून नियुक्ती झाली होती. आता त्यांच्याच समन्वयातून फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची भेट झाली का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता या भेटीनंतर अशोक चव्हाण एखादा मोठा राजकीय निर्णय घेतात का, हे पाहावे लागेल.
विधानपरिषदेला चंद्रकांत हंडोरेंचा पराभव स्वपक्षीयांमुळे, थेट अशोक चव्हाणांवर आरोप
काही दिवसांपूर्वी विश्वादर्शक ठरावाच्या मतदानासाठी अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे काही आमदार उपस्थित राहू शकले नव्हते. हे सर्वजण वेळेत सभागृहात न पोहोचल्याने विधानसभेचे दरवाजे बंद करण्यात आले होते. त्यावेळी अशोक चव्हाण यांनी वाहतूक कोंडीचे कारण पुढे केले होते. विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनाच्या भाषणात ‘अदृश्य हातांचे’ आभार मानले होते. त्यामुळे अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे आमदार जाणुनबुजून सभागृहात उशीरा आले होते का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. तेव्हापासून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सातत्याने रंगत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीमुळे या चर्चेला आणखीनच हवा मिळाली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here