आर्या दिपक जैन (वय-१३), समीर कुलदिप सक्सेना (वय-४३, दोघेही रा. प्रभादेवी, वरळी, मुंबई) असे पवना धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर पायल सक्सेना, लक्ष सक्सेना, यश सक्सेना, आदि चुगानी आणि अंश सुरी यांना स्थानिकांनी वाचवलं आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर सक्सेना आणि त्याची पत्नी व दोन मुले लक्ष व यश यांच्यासह सक्सेना यांच्या मुलांच्या शाळेतील मित्र आर्या दिपक जैन, आदि चुगानी व अंश सुरी हे आज शुक्रवारी सकाळी पवना धरण परिसरात पर्यटनासाठी व फिरायला आले होते. ते सर्वजण बारा वाजण्याच्या सुमारास पवना धरण पाणलोट क्षेत्रातील फांगणे गावच्या हद्दीत पवना धरणाच्या पाण्यात भिजण्याचा आनंद लुटत पोहत होते. यावेळी समीर आणि आर्या यांच्यासह इतर पाच जणांना येथील पाण्यातील खोली व पाण्याच्या आतील भौगोलिक परिस्थितीचा अंदाज आला नाही. या सर्वांची पोहताना दमछाक झाल्याने ते पाण्यात बुडू लागले. यावेळी समीर सक्सेना यांचा कामगार रामकुमार जोखु पासवान हा फक्त पाण्यात उतरला नव्हता.
यावेळी ते सर्व बुडू लागल्याने रामकुमार पासवान यांनी आरडाओरडा केला होता. तो आरडाओरडा ऐकून याठिकाणापासून काही अंतरावर असलेल्या अनिल हिलम, संजय आंद्रे, रामदास चव्हाण, रोहिदास काळे, रामदास काळे व स्वप्नील मोकाशी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाण्यात उड्या मारुन पाण्यात बुडत असलेल्या तिघांना बाहेर काढले तर उर्वरित दोघांचा शोध घेत होते. यावेळी या घटनेची माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अखत्यारित असलेल्या पवनानगर पोलिसांना सांगण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीणचे पोलीस कर्मचारी रफिक शेख व विजय गाले यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस हवालदार रफिक शेख यांनी घटनास्थळी जाताच पाण्यात उतरून स्थानिकांच्या मदतीने आर्या जैन व समीर सक्सेना यांना बाहेर काढून नजीकच्या दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत.