Maharashtra Poliitcs | शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी या मुद्द्यावरु शिंदे गटावर टीकास्त्र सोडले आहे. शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतले जाते आणि दुसरीकडे ढोंगीपणा केला जातो. शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा मेळावा रोखणे, हा म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याची परंपरा पुढे नेली. मात्र, आता त्यामध्ये खोडा घातला जात आहे.

हायलाइट्स:
- राज ठाकरे दसरा मेळाव्याचे प्रमुख अतिथी?
- दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर राज ठाकरेंचं भाषण?
- उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी
तब्बल ५६ वर्षांपासून शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा हे अतूट समीकरण आहे. बाळासाहेब ठाकरे हे दसरा मेळाव्याच्या दिवशी शिवसैनिकांना नवा कार्यक्रम द्यायचे. त्यामुळे शिवसैनिक दरवर्षी न चुकता विचारांचं सोनं लुटण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर आवर्जून यायचे. मात्र, आता महानगरपालिकेने शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला परवानगी दिल्यास बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार असणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा पत्ता आपोआप कट होईल. परंतु, ठाकरे आणि दसरा मेळावा हे समीकरण अतूट असल्याने त्यावरुन रोष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून चाणाक्षपणे एक डाव टाकण्यात आला आहे. एकनाथ शिंदे हे दसरा मेळाव्याला राज ठाकरे यांना आमंत्रण देतील. त्यामुळे दसरा मेळाव्यात ठाकरे घराण्याचा वारसा सांगणाऱ्या व्यक्तीची उणीव जाणवणार नाही. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का ठरू शकतो.
बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातही दसरा मेळाव्याला इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांना बोलावण्यात आले होते. यामध्ये अटलबिहारी वाजपेयी आणि शरद पवार यांचाही समावेश होता. तोच निकष लावून एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर आमंत्रित करू शकतात. एकनाथ शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी याबाबत सूचक भाष्य केले. मला असं वाटतं की, हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या कोणत्याही नेत्याला दसरा मेळाव्याला बोलावलं जाऊ शकते. ज्यांना हिंदुत्वाबद्दल आस्था आहे, आपुलकी आहे, अशांना मेळाव्याला बोलावले जाईल. मग त्यामध्ये राज ठाकरे किंवा देवेंद्र फडणवीस कोणीही असू शकते, असे सदा सरवणकर यांनी म्हटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत दसरा मेळाव्याबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. या भेटीवेळी सदा सरवणकर हेदेखील शिवतीर्थवर उपस्थित होते. या भेटीच्या अवघ्या काही तासांमध्येच शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठीच्या परवानगीचा अर्ज करण्यात आल्याने आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
मनसेची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरे हे दसरा मेळाव्याचे प्रमुख अतिथी असतील, अशी चर्चा सुरु झाल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आपले मत मांडले आहे. आतापर्यंत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बाहेरच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे राज ठाकरे यांना बोलावण्यास काहीही हरकत नाही. परंतु, राज ठाकरे यांना अद्याप दसरा मेळाव्याचे निमंत्रण आलेले नाही. तसे निमंत्रण आले तर राज ठाकरे विचार करून निर्णय घेतील, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.