मुंबई : शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का दिल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी त्यांचा मोर्चा आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघाकडे वळवला आहे. वरळीतील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांची गुरुवारी भेट घेतली. येत्या काही दिवसांत या मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बॅनरबाजीही नुकतीच पाहायला मिळाली. वरळी हा शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ आणि बालेकिल्ला मानला जातो. शिवसेनेत बंडखोरी झाली तेव्हाही वरळीतील एकही पदाधिकारी वा कार्यकर्ता शिंदे गटात गेला नव्हता. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी वरळीकडे मोर्चा वळवल्याचे दिसते.

एसटीच्या ८०० कंत्राटी चालकांना धक्का; महामंडळाने घेतला मोठा निर्णय

गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रथमच वरळी मतदारसंघात एकनाथ शिंदे यांचे बॅनर झळकल्याचे पहायला मिळाले. वरळीचा श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या लाडका मार्केटचा राजाच्या स्वागत कमानीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोस्टर लावण्यात आले होते. इतकेच नाही तर यावर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असेही लिहिण्यात आले आहे. त्यानंतर गुरूवारी शिंदे यांची वरळी मतदारसंघातील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी भेट घेतल्याचे समजते.

या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यांच्य प्रवेशाबाबतची प्रक्रिया सुरू झाल्याचेही समजते. असे प्रत्यक्षात झाल्यास आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातही शिवसेनेला धक्का बसणार हे निश्चित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here