कोल्हापूर : शिकण्याची जिद्द आणि शिक्षणाची साथ असली की माणूस आकाशालाही गवसणी घालू शकतो आणि हे सिध्द करून दाखवलं आहे कोल्हापुरातील कळंबा इथं राहणाऱ्या मिरा बाबर यांनी. मिरा बाबर या सध्या काळंबा जेल इथं तुरुंगअधिकारी आहेत. मात्र, नुसत्याच तुरुंगअधिकारी नाहीत तर त्यांनी नाथपंथी डवरी गोसावी समाजातील पहिल्या तुरुंगअधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. या यशापर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय खडतर प्रवास प्रवास करावा लागला असून हा प्रवास प्रत्येकाला थक्क करणारा आहे. कशा झाल्या मिरा बाबर तुरुंगअधिकारी आणि काय आहे त्यांची संघर्ष गाथा जाणून घेऊया मटासुपरवूमनच्या खास कल्पनेतून… (महाराष्ट्र टाईम्सने २५ वर्ष पूर्ण केल्याच्या आनंदात आम्ही घेऊन आलोय #MataSuperWoman. प्रत्येक सुपरमहिलेची सुपर कहाणी फक्त तुमच्यासाठी!)

​उदरनिर्वहासाठी भिक्षा मागितली

मीरा विजय बाबर या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील आपल्या देशात अनेक जाती जमाती आहेत आणि यातील जात म्हणजे नाथपंथी डवरी गोसावी समाज. या समाजातील लोक हे आपला उदरनिर्वह करण्यासाठी भिक्षा मागतात आणि यासाठी ते संपूर्ण देशात फिरतात. आपण पहिलं असाल अजूनही ग्रामीण भागात बैलडागीत मंदिरं तयार करून घरोघरी जाऊन भिक्षा मागत असतात. या समाजाला सर्वात मागासलेला समाज असे ही म्हंटले जाते. आपलं संपूर्ण आयुष्य भटकंती करत असल्याने या समाजातील मुलं-मुली सुद्धा शिक्षणापासून वंचित राहतात आणि अशा या समाजात मिरा बाबर यांचा जन्म झाला.

​मीरा यांचा जन्म झाला पण नाळ तोडण्यासाठीही साधनं नव्हती…

मीरा यांचा जन्म ही काय सोपा नव्हता. रोज दहा-पंधरा किलोमीटरचा प्रवास होत असत आणि इतक्या भल्या मोठ्या ओझ्याला गाढव होते. तिची आई सखुबाई नऊ महिन्यांची गरोदर होती. कधीही बाळंतीण होऊ शकते अशी शक्यता असताना बिऱ्हाड तसेच जात होते. असेच एका सकाळी बिऱ्हाड उठले अन् आईला रस्त्यातच बाळंत कळा सुरू झाल्या. तिथेच बाळंतपण झालं आणि मीराचा जन्म झाला. मात्र, नाळ तोडण्यासाठीही साधनं नव्हती. कशीबशी नाळ तोडली आणि कापडात गुंडाळून पुन्हा प्रवास सुरू केला. मीरा यांना त्यांच्यासह एकूण ८ भावंड आहेत. त्यापैकी ५ भाऊ, २ बहिणी तर एका भावाचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे या सर्व भावंडांचे जन्म हे वेगवेगळ्या राज्यात झाले आहे.

​मीरा यांच्या शिक्षणासाठी वडिलांनीही कधीही केला नाही विरोध…

मीरा यांचे वडील रामचंद्र बाबाजी भोसले हे देखील दिवसभर भिक्षा मागत आणि मिळालेल्या भिक्षेतून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करायचे. मिराच्या वडिलांचं शिक्षण ही जेम तेम झालेलं. मात्र, रामचंद्र भोसले यांचे मित्र हे प्राध्यापक होते आणि त्यांनी रामचंद्र यांना मुलांना शिकवण्यास प्रोत्साहन दिले.आणि येथून सुरू झाला मिरा यांचा शिक्षणाचा प्रवास… ज्या समाजातील मुलं ही शिक्षणापासून वंचित होती तेथे मुलींना कसे शिक्षण मिळणार. अशात मिरा यांना शिक्षण देण्यास आग्रह केला. याला विशेष म्हणजे त्यांच्या वडिलांनीही विरोध केला नाही आणि मिरा या त्यांच्या आजीच्या गावी गेल्या आणि प्राथमिक शाळेत जाऊ लागल्या.

​पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात गणित या विषयात पदवीधर

मिरा यांना शाळेला सुट्टी लागली की त्या आपल्या वडिलांकडे जात असत. वडील हे भटकंती करत भिक्षा मागत असल्याने ते दिल्ली, मिजारोम, आसाम, नागालँड, पाकिस्तान, म्यानमार अशा भागात फिरायचे. मिरा यांचे भाऊ हे देखील 1993 मध्ये पुणे विद्यापीठात MPSC ची तयारी करत होते. अशात भावंडांनी मिरा यांना पुण्यात घेऊन आले त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात गणित या विषयात पदवी घेतली.

​मुलं पोटात असताना तलाठी पदासाठी परीक्षा दिली, जेलर पदाच्या परीक्षेत यश मिळवलं

दरम्यान, शिक्षण सुरू असताना मिरा यांचे लग्न झाले आणि त्यांना सासरही चांगलं मिळालं. मिरा यांना त्यांचे पती विजय यांची मोठी साथ लाभली. मिरा या लग्नानंतरही आपल्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू ठेवल्या आणि मुलं पोटात असताना त्यांनी तलाठी पदासाठी परीक्षा दिली. अवघ्या १० दिवसाच्या मुलाला घेऊन २०१० साली त्या तलाठी म्हणून एका खेडेगावात रुजू झाल्या. यानंतरही त्यांनी आपले काम करत स्पर्धा परीक्षासाठी अभ्यास केला. यावेळी त्यांनी जेलर पदासाठी परीक्षा दिली आणि त्यात त्यांनी यश मिळवलं. मिरा या नाथपंथी डवरी गोसावी समाजातील पहिल्या तुरुंगअधिकारी झाल्या. सध्या त्या कोल्हापुरातील कळंबा कारागृहात तुरुंग अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना दोन मुलं देखील आहेत आणि त्यांच्या पतीची भक्कम साथ देखील आहे.

​’कष्टाला पर्याय नाही मात्र कल्पवृक्ष म्हणजे काय असते कल्पवृक्ष हे आपण स्वतः असतो’ – मीरा बाबर यांचे शब्द

अद्यापही त्यांच्या समाजातील अनेक मुलं-मुली हे शिक्षणापासून वंचित आहेत. मीरा या त्यांच्या गावी गेल्या की मुलींना शिकवण्यासाठी प्रबोधन करत असतात. मिरा यांना त्यांच्या वडिलांची आणि भावंडांची मिळालेली साथही त्यांना बहुमोलाची ठरली. कारण, मिरा यांच्यात असलेली प्रचंड जिद्द आणि अभ्यासाची आवड. त्या म्हणतात की कष्टाला पर्याय नाही मात्र कल्पवृक्ष म्हणजे काय असते कल्पवृक्ष हे आपण स्वतः असतो. आपण जे स्वतःला मागाल ते मिळणारच…शिक्षण म्हणजे गुळासारखं आहे जेवढं घ्याल तेवढं गोड होईल तसेच जेवढे शिकाल तेवढे मोठे व्हाल असे मिरा बाबर म्हणतात. अशा या सुपरवूमनला ‘महाराष्ट्र टाईम्स’चा सलाम !!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here