अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नेमकं काय झालं?
चौबे यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ३३-१ असा एकतर्फी विजय मिळवला. या निकालात अनपेक्षित काहीच नव्हते. भुतिया यांना सिक्कीम संघटनेनेही मतदार केले नव्हते. त्यांना कोणत्याही राज्य संघटनेची साथ नसल्याचे स्पष्ट दिसत होते. यापूर्वीचे दोन अध्यक्ष प्रियरंजन दासमुन्शी आणि प्रफुल्ल पटेल हे पूर्णवेळ राजकारणात होते. आता चौबे यांनीही पश्चिम बंगालमधून भाजपसाठी निवडणूक लढवली आहे; पण त्यांनी स्पर्धात्मक फुटबॉलचा दांडगा अनुभव आहे.
भुतिया आणि चौबे हे दोघेही ४५ वर्षांचे. दोघेही एकाचवेळी ईस्ट बंगाल संघाकडून खेळले होते. चौबे राष्ट्रीय संघातून कधीही खेळले नाहीत, तर भुतिया यांच्यावर भारतीय संघाची मदार असे. दरम्यान, उपाध्यक्षपदाच्या नवडणुकीत कर्नाटकमधील काँग्रेसचे नेते एन. ए. हॅरिस यांनी भुतियांचे साथीदार असलेले राजस्थानमधील काँग्रेसचे नेते मानवेंद्रसिंह यांचा २९-५ असा पराभव केला, तर खजिनदारपदाच्या निवडणुकीत किपा अजय यांनी गोपालकृष्ण कोसाराजू यांना ३२-१ असे हरवले. भुतिया यांच्या उमेदवारीस मानवेंद्र आणि कोसाराजू यांचा पाठिंबा होता.
‘भारतीय फुटबॉलच्या प्रगतीसाठी मी प्रयत्न करीत राहणार. कल्याण चौबे भारतीय फुटबॉलला प्रगतीपथावर नेतील अशी अपेक्षा आहे. मी संघटनेच्या कार्यकारीणीत आहे, त्यामुळे भारतीय फुटबॉल महासंघासाठी काम करीत राहणार आहे,’ असं बायचुंग भुतिया यांनी म्हटलं आहे.
रिजीजूंनी दडपण आणल्याचा आरोप
केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी राज्य संघटनांवर भुतिया यांच्याविरोधात मतदान करण्यासाठी दडपण आणले. प्रत्येक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हॉटेल रूममध्ये जाऊन त्यांनी हे दडपण आणल्याचा दावा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार मानवेंद्रसिंह यांनी केला. या निवडणुकीत सुरुवातीस हस्तक्षेप केला जात होता. रिजीजू यांनी गुरुवारी रात्री सर्व मतदारांची भेट घेतली आणि बायचुंगना मत न देण्याची सूचना केली. हा हस्तक्षेप योग्य नव्हे. भारतीय फुटबॉलचे यामुळे अधिकच नुकसान होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी चांगल्या खेळाडूची निवड आवश्यक होती. ही फॉर्म्युला वन शर्यत होती. त्यासाठी अॅम्बेसीडर नव्हे फेरारी हवी. मतदारांनी भुतियालाच पसंती देणे योग्य ठरले असते. एका आठवड्यापूर्वी सर्व राज्य संघटनांनी कोणत्याही दडपणाला बळी न पडण्याचे ठरवले होते; पण सर्वच चित्र बदलले, असेही ते म्हणाले.