विशेष म्हणजे संशयीत आरोपी पोपट चौघुले याने पोलिसांसारखा युनिफॉर्म देखील शिवला होता. त्यानंतर पोलीस युनिफॉर्म मध्ये व्हाट्सअप कॉल करून पैसे उकळत होता. याबाबत मलकासिद्ध रमेश जमादार (वय २८) (रा. हालचिंचोळी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक म्हळप्पा सुरवसे यांनी अधिकृत माहिती दिली.
सोशल मीडियावर पोलीस युनिफॉर्मवरील डीपी ठेवत चौघांना फसविले
तोतया पोलीस कॉन्स्टेबल पोपट रामचंद्र चौघुले याने टेलरकडून खाकी शर्ट पॅन्ट, पोलीस बॅच लावलेलं पोलीस कॉन्स्टेबलचा ड्रेस शिवून घेतला. व्हाट्सअपवर डीपी देखील पोलीस युनिफॉर्म मधील ठेवला होता. हालचिंचोळी येथील तरुणांशी संपर्क करत त्याने पोलीस भरतीचे आश्वासन दिले होते.१० मे पासून तोतया पोलीस चार तरुणांना व्हिडिओ कॉल करत पैशांची मागणी करत होता. यामध्ये मलकारसिद्ध रमेश जमादार, रवी गेनसिद्ध जमादार, समर्थ अशोक भगत, आकाश चंद्रकांत कोळी यांनी पोलीस भरतीच्या आमिषाला बळी पडून तोतया पोलीस पोपट चौघुलेस प्रत्येकी ६० हजार रुपये रक्कम दिली होती. १० मे पासून १ सप्टेंबरपर्यंत एकूण २ लाख ४० हजार रुपये रक्कम दिली होती.
तोतया पोलिसाचा नेहमी पोलीस युनिफॉर्ममध्ये व्हिडिओ कॉल
तोतया पोलीस पोपट चौघुले हा चौघा तरुणांना नेहमी पोलीस युनिफॉर्ममध्ये व्हिडिओ कॉल करत होता. पोलीस आपल्या सोबत बोलत आहे, असा विश्वास करून चौघा तरुणांनी तोतया पोलिसाला रोख रक्कम दिली होती. ज्यावेळी या चार तरुणांना आपली फसवणूक झाली आहे आणि हा खराखुरा पोलीस नाही तोतया पोलीस आहे याची माहिती मिळताच पोलीस भरतीची प्रॅक्टिस करणाऱ्या चौघा तरुणांनी वळसंग पोलीस ठाण्यात येऊन १ सप्टेंबर रोजी फिर्याद दिली व गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल होताच फरार
तोतया पोलिसाला आपले बिंग फुटल्याचे माहिती मिळताच तो राहत्या घरातून फरार झाला. वळसंग पोलिसांनी आपल्या सूत्रांमार्फत त्याचा ठावठिकाणा लावत पोपट चौगुले या तोतया पोलीस कॉन्स्टेबलला दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज या गावातून अटक केली आहे. तसेच त्याच्याजवळ असलेला पोलीस युनिफॉर्म देखील जप्त केला आहे. त्याला कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याची दोन दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. याचा अधिक तपास वळसंग पोलीस ठाण्याचे एपीआय अतुल भोसले, पीएसआय म्हळप्पा सुरवसे करत आहेत.