केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, कोल्हापूर हे राज्यात महत्त्वाचे शहर आहे. कोल्हापूरची प्रगती आणि विकास जलद गतीने होण्यासाठी कोल्हापूर मधून विविध राज्यांना जोडणाऱ्या विमानसेवा अधिक प्रमाणात सुरु होणे आवश्यक आहे. या दृष्टीने विमानतळ विस्तारीकरणाची कामे दर्जेदार व जलदगतीने होणे गरजेचे आहे. विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या ६४ एकर भूसंपादनाची प्रक्रिया जलद पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पॉवर ग्रीड कार्पोरेशन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर मुंबई विमानसेवा ५ ऑक्टोबर पासून सुरु होत असल्याचे सांगून विमानतळ विस्तारीकरण काम जलदगतीने पूर्ण होण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत असल्याचे सांगितले. अकासा आणि स्टारएअरलाइन्सने मान्यता दिल्याने ५ ऑक्टोबर पासून सकाळी व सायंकाळी कोल्हापूर मुंबई विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच कोल्हापूर बंगळुरू विमानसेवाही सुरू होणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. गोव्यालाही ही सेवा सुरू व्हावी अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेच्या सद्यस्थितीबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी माहिती दिली. विमानतळ विकास प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया यांनी विमानतळ विस्तारीकरण कामाच्या सद्यस्थितीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.