मुंबई : भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईत शनिवारी रात्री उशिरा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते दादर या परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली. मुंबईच्या चेंबूर परिसरात जोरदार वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. जोरदार वारं सुटण्याची शक्यता असल्यानं हवामान विभागानं गणेश मंडळांनी गणेशोत्सवासाठी घालण्यात आलेले मंडप सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान विभागानं मुंबईसह, ठाणे, पालघर, औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे अहमदगर, पुणे, लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूरमध्ये देखील पुढील तीन ते चार तासात पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईत आजपासून ३ दिवस पावसाचा व हवेचा जोर वाढण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव मंडळानी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्यास सांगावं असं आवाहन करण्यात आलं आहे. अतिवृष्टीमुळे मंडपातील वीज, बत्ती मुळे शॉर्टसर्किट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच मंडपात पाणी शिरुन काही दुर्घटना घडू नये विराजमान झालेला बाप्पा पर्यंत पाणी पोहोचू नये किंवा सजावट खराब होणे यासाठी सतर्क राहाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. वादळामुळे मंडप किंवा मंडपाचे शेडचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
आपत्कालीन परिस्थितीत मदतीची गरज भासल्यास आपत्कालीन विभागाचा 1916 या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी केलं आहे. याशिवाय समितीला संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.