मुंबई : राज्यातल्या अस्थिर राजकीय परिस्थितीला संधी म्हणून बघा, अशी सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केली. यावेळी आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने मनसैनिकांनी तयारीला लागण्याचे आदेशही राज ठाकरे यांनी दिले. त्याच अनुषंगाने राज ठाकरे यांचीही मैदानात उतरण्याची संपूर्ण तयारी झाली आहे. गणेशोत्सव सरताच राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. नागपूर, चंद्रपूर आणि अमरावतीला जाऊन राज ठाकरे तिथे चाचपणी करणार आहेत. भाजपच्या साथीने महाविकास आघाडीला धक्का देण्याची तयारी राज ठाकरे यांनी आखली असल्याची माहिती आहे. त्याची सुरुवात ते नागपूरमधून करतील.

राज ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर असतील. १७ आणि १८ सप्टेंबरला राज विदर्भात येतील. त्यांच्या या दौऱ्याच्या तयारीसाठी मनसेचे प्रवक्ते माजी नगरसेवक संदीप देशपांडे, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, अगोदरच चार दिवस नागपुरात येणार आहे, अशी माहिती मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी दिली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरल्याची टीका शिंदे गटातील आमदार-खासदार, भाजप नेते आणि मनसेकडूनही केली जाते. अगदी राज ठाकरे आपल्या भाषणातही शिवसेनेवर जळजळीत टीका करताना दिसतात. अनेकदा त्यांनी भाजपची कड घेतल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना भविष्यात भाजपशी युती करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला. गेल्या काही दिवसात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री विनोद तावडे यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे मनसे-भाजपच्या वाढत्या जवळीकीची चर्चा रंगली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आता भाजप, शिवसेनेचा शिंदे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तीन पक्षांची युती होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय.

शिवसेनेचे मतदार फोडण्याचा प्लॅन, भाजप-शिंदे-मनसे यांची महायुती?
महाविकास आघाडीला उध्वस्त करण्यासाठी नागपूर महापालिकेची निवडणूक भाजप आणि मनसे साथ साथ लढणार असल्याचे आता जवळपास निश्‍चित झाले आहे. नागपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस पक्ष मजबूत आहेत. त्या तुलनेत शिवसेना आणि राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही. नागपूर महापालिकेत तर शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचा एकच नगरसेवक आहे. त्यामुळे महापालिकेच्या जागा वाटपात काँग्रेस फार जागा सोडण्यास तयार होणार नाही. तसेच सेना आणि राष्ट्रवादीची फारशी ताकद नसताना त्यांच्याशी युती करुन तसेच त्यांना जास्त जागा देऊन त्यांची ताकद वाढायला नको, या मताचे स्थानिक काँग्रेसचे पुढारी आहेत.

दुसरीकडे शिवसेनेची मतपेटी फोडण्यासाठी भाजप मनसेला जवळ खेचत आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते राज ठाकरेंच्या भेटी घेत असल्याने ते समीकरण सगळ्यांच्या समोरच आहे. फक्त आता मनसे भाजप युतीची अधिकृत घोषणा कधी होतेय? याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here