या प्रकरणी आता सामाजिक कार्यकर्ते भारत भोसले यांनी करुणा मुंडे यांच्याविरूद्ध फिर्याद दिली आहे. करुणा मुंडे यांच्या आधीच आपण तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांनी ती नोंदवून घेतली नाही. उलट मधल्या काळात करुणा मुंडे यांच्या तक्रारीवरून आपल्याविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आला, असा त्यांचा आरोप आरोप आहे. आता पोलिसांनी करुणा यांच्याविरूद्धही गुन्हा दाखल केला आहे.
भोसले यांनी फिर्यादीत म्हटलं आहे, आपली करुणा धनंजय मुंडे उर्फ करुणा अशोक शर्मा यांच्यासोबत ओळख झाली होती. मुंडे यांनी आपल्याला नवीन पक्ष काढण्यासाठी सोबत येण्याची विनंती केली. पक्षासाठी पैसे लागतील म्हणून ते जमा करण्यास सांगितले. सुरुवातीला आपण ४ लाख रुपये दिले. त्यानंतर त्यांनी आणखी ३६ लाख रुपये मागितले. त्यावर आपण काही पैसे आणि काही दागिने असे मिळून सुमारे ३४ लाख रुपये दिले. पक्षाची नोंदणी झाल्यानंतर पक्षाकडे पैसा जमा झाल्यावर आपले पैसे परत करण्याचे आश्वासन मुंडे यांनी दिले होते. आणखी पैसे हवे असल्याने माझ्या ओळखीचे विद्या अभंग व इतर तीन यांच्या नावावर असलेला बंगला पक्षाचे कार्यालय म्हणून दाखवण्यासाठी साठेखत करून दिला. त्यानंतर मुंडे यांनी कुठल्याही प्रकारचे पक्ष नोंदणीसाठी रजिस्ट्रेशन केलं नाही. त्यामुळे त्यांची ही योजना बारगळत असल्याचे पाहून आम्ही पैशाची मागणी केली. मात्र, त्यांनी पैसे परत न देता धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यामुळे आपण पोलिसांकडे तक्रार केली. स्थानिक पोलिसांनी दखल न घेतल्याने पोलीस अधीक्षकांकडेही तक्रार केली. याची माहिती समजल्यावर उलट करुणा मुंडे यांनीच आपल्याविरूद्ध खोटी फिर्याद दिली आणि त्यानुसार पोलिसांनी गुन्हाही दाखल करून घेतला,’ अशी फिर्याद भोसले यांनी दिली आहे.
दरम्यान, भोसले यांच्या फिर्यादीनुसार आता पोलिसांनी करुणा मुंडे यांच्याविरुद्धही फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. एकाच प्रकरणात आता अशा पद्धतीने परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान आहे.