tata group former chairman | देशाच्या उद्योगवर्तुळातील आघाडीच्या चेहऱ्यांपैकी एक असलेले सायरस मिस्त्री यांचे रविवारी दुपारी अपघाती निधन झाले. पालघरच्या चारोटी परिसरात त्यांची मर्सिडीज कार दुभाजकावर आदळली. यामध्ये सायरस मिस्त्री यांना गंभीर दुखापत झाली, यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने उद्योगक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. सायरस मिस्त्री हे २०१२ ते ऑक्टोबर २०१६ या काळात टाटा सन्सचे अध्यक्ष होते.

 

Cyrus Mistry Sharad Pawar
शरद पवार आणि सायरस मिस्त्री

हायलाइट्स:

  • शरद पवार यांनी सायरस मिस्त्री यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला
  • असं काही घडेल यावर कोणाचाही विश्वास बसत नाही
  • देशाच्या विकासात शापुरजी पालनजी कुटुंबाचं निश्चितच मोठं योगदान
पुणे: सायरस मिस्त्री हे प्रतिनिधित्व करत असलेल्या शापुरजी-पालनजी कुटुंबीयांचं देशाच्या विकासात मोठं योगदान राहिलं आहे. जे शापुरजी-पालनजी कुटुंबीयांना जवळून ओळखतात त्यांना माहिती आहे की, गेल्या दोन वर्षांमध्ये या कुटुंबावर एकापाठोपाठ एक अनेक आघात झाले. सुरुवातीला सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर कुटुंबातील काही व्यक्तींचा मृत्यू झाला. तर काहींना गंभीर आजारांना तोंड द्यावे लागले. अशातच आता सायरस मिस्त्री यांचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. मिस्त्री कुटुंबांबाबत संकटांची दुर्दैवी मालिकाच सुरु आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली. ते रविवारी पुण्यात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
Cyrus Mistry: उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा पालघरमध्ये कार अपघातात मृत्यू
यावेळी शरद पवार यांनी सायरस मिस्त्री यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर सायरस मिस्त्री हे बाकीच्या गोष्टींपासून दूर राहिले. आजच्या त्यांच्या अपघाती निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. ज्या पद्धतीने त्यांच्या गाडीचा अपघात झाल्याचे ऐकायला मिळाले, ते ऐकून असं काही घडेल यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. भारताच्या औद्योगिक आणि इतर क्षेत्रांमधील विकासात शापुरजी पालनजी कुटुंबाचं निश्चितच मोठं योगदान आहे. या कुटुंबाच्या नव्या पिढीचा प्रतिनिधी सायरस हे आपल्यात राहिले नाहीत, हा देशासाठीही मोठा धक्का आहे. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना या दु:खातून सावरण्यासाठी बळ मिळो, असे शरद पवार यांनी म्हटले.
सायरस मिस्त्री हक्कानं फोन करायचे, वरणभात, खिचडी करुन ठेव म्हणायचे, त्यांचं जाणं धक्कादायक : सुप्रिया सुळे
यावेळी शरद पवार यांनी शापुरजी-पालनजी कुटुंबीय आणि सायरस मिस्त्री यांच्या आठवणींना उजाळा दिला. महाराष्ट्रात आणि देशात काही पारशी कुटुंबांनी प्रसिद्धीपासून दूर राहत विविध क्षेत्रात देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले. अशा पारशी कुटुंबांच्या नामावलीवर नजर टाकल्यास त्यामध्ये फारसं प्रसिद्ध नसलेल्या शापुरजी पालनजी कुटुंबांचं नाव घ्यावं लागेल. शापुरजी-पालनजी यांनी महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. एक काळ असा होता की, टाटा समूहात टाटांपेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक शापुरजी पालनजी कुटुंबाची होती. नंतरच्या काळात टाटांनी आपली गुंतवणूक वाढवत नेली. याच शापुरजी पालनजी कुटुंबातील पुढच्या पिढीचे प्रतिनिधित्व सायरस मिस्त्री करत होते. ते अनेक वर्षे टाटा सन्सच्या अध्यक्षपदी होते. रतन टाटा यांनी जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर टाटा समूहाची जबाबदारी सायरस मिस्त्री यांच्याकडे आली. सायरस मिस्त्री हे मृदूभाषी, अधिक कष्ट करणारे आणि व्यवसायात बारकाईने लक्ष घालणारे होते. टाटा सन्सच्या अध्यक्षपदाच्या छोट्याशा कार्यकाळातही त्यांनी चांगले काम करुन दाखवले होते, असे शरद पवार यांनी सांगितले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here