Cyrus Mistry accident death | २४ ऑक्टोबर २०१६ रोजी सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात येणार होते. मिस्त्री यांचा कंपनीसोबतचा करार ३१ मार्च २०१७ रोजी संपुष्टात येणार होता. त्याआधीच त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. मात्र, सायरस मिस्त्री यांनी न्यायालयात धाव घेत या निर्णयाविरोधात शेवटपर्यंत लढा दिला होता. परंतु, पुढे जाऊन सर्वोच्च न्यायालयाने सायरस मिस्त्री यांच्यावरील कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता.

हायलाइट्स:
- रतन टाटा यांनी दीर्घकाळ टाटा सन्सचे अध्यक्षपद भुषविले
- त्यामुळे सामान्य कर्मचाऱ्यांना रतन टाटा यांच्यापर्यंत पोहोचता येत नसे
- सायरस मिस्त्री यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याशी हस्तांदोलन केले होते
सायरस मिस्त्री हे टाटा सन्सला व्यावसायिक चेहरा देण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे त्यांच्या काळात समूहातील अंतर्गत राजकारण उफाळून आले. रतन टाटा यांनी दीर्घकाळ टाटा सन्सचे अध्यक्षपद भुषविले. त्यांच्या अवतीभोवती नेहमी सुरक्षारक्षकांचा गराडा असायचा. त्यामुळे सामान्य कर्मचाऱ्यांना रतन टाटा यांच्यापर्यंत पोहोचता येत नसे. मात्र, सायरस मिस्त्री यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ३ मार्च २०१२ रोजी टाटा जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात प्रत्येक कर्मचाऱ्याशी हस्तांदोलन केले होते. त्यांनी कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक संदेश गेला होता.
तरुण कर्मचाऱ्यांवर अधिक विश्वास
सायरस मिस्त्री हे संचालक मंडळाच्या बैठकीत नेहमी तरुणांनी मांडलेल्या नव्या कल्पना आवर्जून ऐकून घेत असत. टाटा समूहाला पुढे जायचे असेल तर आपल्याला नव्या कल्पना अंगिकारल्या पाहिजेत, असे मिस्त्री यांचे मत होते. त्यामुळेच सायरस मिस्त्री यांच्या कार्यकाळात टाटा स्टील आणि अन्य कंपन्यांच्या नेतृत्त्वात महत्त्वाचे बदल करण्यात आले. त्यामुळे टाटा समूहातील ज्येष्ठ वर्ग नाराज झाला. यामधूनच सायरस मिस्त्री यांच्याविरुद्ध अंतर्गत राजकारण सुरु झाले. सायरस मिस्त्री यांनी सुचविलेले बदल हे टाटा समूहाच्या धोरणांविरोधात असल्याचा आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे २४ ऑक्टोबर २०१६ रोजी सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून दूर करण्यात आले. त्यांच्याजागी पुन्हा रतन टाटा यांची नियुक्त झाली.
नॅनो प्रकल्प आणि कपड्यांचा व्यवसाय बंद करण्याला सल्ला
सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहाचा गुजरातमधील कापडउद्योग बंद करण्याचा सल्ला दिला होता. तसेच रतन टाटा यांच्यादृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेला नॅनो कारचा प्रकल्पही बंद करावा, असे मिस्त्री यांचे मत होते. या तोट्यात चालणाऱ्या कंपन्यांमुळे समूहावरील कर्जाचा बोजा वाढू नये, असा त्यांचा उद्देश होता. मात्र, टाटा समूहाचे धोरण हे नेहमी कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा विचार करणारे होते. त्यामुळे अनेकांना सायरस मिस्त्री यांचा व्यावसायिक दृष्टीकोन पटला नाही. यामुळेच सायरस मिस्त्री यांच्या तक्रारी रतन टाटा यांच्याकडे जाऊ लागल्या. याच दबावातून रतन टाटा हे टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा स्वीकारण्यास तयार झाले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.