अनंत साळी, जालना : येथील सदाव्रते कुटुंबीयांनी १५०० पुस्तकांची गणपती बाप्पा भोवती आरास करत देखाव्यातून ‘ग्रंथ हेच गुरू, ग्रंथ हीच संपत्ती’चा संदेश दिला. करोना संसर्ग सुरु झाल्यानंतर गेल्या २ वर्षांमध्ये गणेशोत्सवाच्या आनंदावर मर्यादा आल्या होत्या. २ वर्षानंतर या वर्षी गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि अनोख्या पद्धतीनं साजरा केला जात आहे. गणपती बाप्पांची स्थापना करताना त्यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांपर्यंत चांगला संदेश पोहोचला जावा, या साठी जालना शहरातील कवयित्री आरती सुहास सदाव्रते यांनी गणपती भोवती 1500 पेक्षा जास्त पुस्तकांची आरास केली आहे. भारतीय संविधाना सोबतच रामायण, महाभारत,ज्ञानेश्वरी,कृष्ण, दासबोध,साने गुरुजी, स्वामी विवेकानंद यांच्या अनमोल पुस्तकांसोबतच लक्ष्मीबाई टिळक, स्मृतिचित्रे,साधना आमटे यांचे ‘समिधा’ आदी पुस्तकांचा सुबक देखावा सदावर्ते यांनी तयार केला आहे.

गणेशोत्सवातून वाचन संस्कृतीला बळ,ग्रंथ हेच गुरु असा संदेश, जालन्यात १५०० पुस्तकांची आरास

करोना विषाणूचा संसर्ग कमी झाल्यानंतर यंदा गणेशोत्सव जोरदार साजरा होत आहे. नागरिक वेगवेगळ्याप्रकारे गणेशोत्सव साजरा करत आहेत. अनेक नागरिक सणाच्या निमित्तानं सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न देखील करत असतात. जालना जिल्ह्यातील सदाव्रते कुटुंबानं देखील अशाच प्रकारचा अनोखा संदेश दिला आहे. पुस्तकांचा वापर गणपतीची आरास करण्यासाठी करुन सदाव्रते कुटुंबानं वाचनसंस्कृतीला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या यश आलं आहे.

गणेशोत्सवातून ग्रंथ हेच गुरु असा संदेश

ग्रंथ हेच गुरू आणि ग्रंथ हीच संपत्ती असा संदेश देण्यासाठी यंदा वेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय आरती आणि पेशाने मराठीचे प्राध्यापक,साहित्यिक,लेखक असलेल्या सुहास सदाव्रते यांनी घेतला. घरात साहित्यिक वातावरण असल्याने वाचनासाठी आणलेल्या विपुल ग्रंथ संपदेचा इतरांनाही वाचनासाठी उपयोग व्हावा या पुस्तकांमधील विचारधारा इतरांपर्यंत पोहचावी या ध्येयाने या कुटुंबीयांनी ग्रंथसंपदेचा देखावा तयार केला आहे.सदावर्ते कुटुंबानं वाचन संस्कृती वाढावी म्हणून बनवलेल्या पुस्तकांच्या सजावटीचं कौतुक होत आहे.

साहित्यिकांच्या छायाचित्रांचा वापर

सदाव्रते यांनी गणपती बाप्पा भोवतालच्या या सजावटीत साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकापासून भारतीय संस्कृती,मंदिर प्रवेशाची भाषणे अशी २५ पुस्तके मांडली आहेत.स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांच्या कविता, संन्यस्त खड्ग,बोधिवृक्ष अशी पुस्तके देखील ठेवण्यात आली आहेत.सोबतच गणपतीसमोर विविध साहित्यिकांची छायाचित्रेही मांडण्यात आली आहेत.बापाच्या उत्सवातून वैचारिक परंपरा जोपासली जावी असा विचार करत या कुटुंबीयांनी केल्याचं सदाव्रते यांनी सांगितलं. धार्मिक, वैचारिक,सामाजिक, सांस्कृतिक,महिला आदी विविध विषयांवरील पुस्तकांचा वापर सदावर्ते यांनी गणपतीच्या सजावटीसाठी केला आहे.

साधनाच्या दिवाळी अंकाचा वापर

बाप्पांच्या आगमनाच्या दोन दिवस आधीपासून पुस्तकांची तयारी चाललेली होती. आपल्या ग्रंथ संपदेतील दीड हजार पेक्षा जास्त पुस्तके मांडणी करून पर्यावरणपूर्वक गणरायाची स्थापना सदाव्रते कुटुंबीयांनी केलीआहे. या देखाव्याला पाहण्यासाठी येणाऱ्यांना राजमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी शाहू महाराज,लोकमान्य टिळक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांच्या कार्याची ओळख करून देणाऱ्या पुस्तकांसोबतच बालकथेची पुस्तकेही मांडण्यात आली आहेत.साने गुरुजींनी सुरू केलेल्या साधना साप्ताहिकाचे यंदाचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे.या सजावटीत ‘साधना’ दिवाळी अंकही मांडण्यात आले आहेत.

सजावट पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

गणपती सजावट पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.समर्थ रामदास स्वामी यांचे ‘दासबोध’ संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेवांच्या अभंगांची पुस्तके आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, कवी बा. भ. बोरकर यांचा ‘आनंद भैरवी’ कवितासंग्रह, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर यांचा विवेकानंद जीवनचरित्र, युवा चेतना अश्या एका पेक्षा एक सरस साहित्याची मेजवानी इथे पाहायला मिळते आहे.

महिला साहित्यिकांच्या पुस्तकांचा वापर

आरास सजावटीत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे यांची छायाचित्रे लक्ष वेधून घेतात. शांता शेळके, इंदिरा संत, सरोजिनी बाबर, बहिणाबाई चौधरी यांची छायाचित्रेही दर्शनी भागात मांडण्यात आली आहेत.’धृपद’ हा कवितासंग्रह, मराठी बखर गद्य हे पुस्तक आहे. साधना आमटे ‘समिधा’, सुनीता देशपांडे यांचे ‘आहे मनोहर तरी, लेखिका वीणा गवाणकर यांचे ‘एक होता कार्व्हर’ अशी अनेक पुस्तके आहेत.

​मुलांमध्ये वाचनसंस्कृती रुजवण्याचा प्रयत्न​

आरती सदाव्रते यांनी पुस्तकांची आरास करण्यामागील भूमिका मांडली. अलीकडच्या काळात मुलं काही माहिती आवश्यक असली तर गुगलवर सर्च करतात, मात्र, पुस्तकात ती माहिती शोधल्यास वाचनाची आवड निर्माण होते. मराठी साहित्य, मराठी भाषा समृद्ध आहे. कोणताही विषय घेतला तरी आपल्या भाषेत साहित्य उपलब्ध आहे. करोनाच्या काळात शाळा ऑनलाइन झाल्यानं मुलांची वाचनाची आवड कमी झाली. तुम्ही वाचनाची आवड निर्माण करावी, बालसाहित्यापासून वाचनाची सुरुवात केली तर विचारवंतांचे विचार समजण्यास मदत होईल, असं सदाव्रते म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here