यावल तालुक्यातील न्हावी येथे भाजप जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, लोकनियुक्त सरपंच भारती नितीन चौधरी, उपसरपंच उमेश बेंडाळे, माझी पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी यांच्या पाठपुरावाने गावासाठी हे पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. या जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन सोहळा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.
पुढे बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून आमच्यावर टीका होते आहे. गेल्या ३५ वर्षांत आम्ही काय केले ते आम्हाला माहिती आहे. झेंडा लावणारे आम्ही आहोत, मार खाणारे आम्ही आहोत. तडीपार होणारे आम्ही, जेलमध्ये जाणारे आम्ही. मात्र, ते ३२ वर्षाचं पोरगं…आदित्य ठाकरे आमच्यावर टीका करतं…मात्र तू गोधडीत पण नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत, असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिंदे गटात गेलेल्या आमदारांवर टीका करणारे आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार शब्दप्रहार केले.
तुम्ही इस्टेटचे वारसदार होऊ शकतात, मात्र विचारांचे वारसदार होऊ शकत नाही. बाळासाहेबांचा विचारांचा वारसदार हा गुलाबराव पाटील आहे, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर टीकेची तोफ डागली. कोण आदित्य ठाकरे?, असे म्हणत यांना काय अधिकार आहे आमच्यावर टीका करण्याचा असेही यावेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
ज्याप्रमाणे अलीबाबाके चाळीस चोर होते, तसे आम्ही शिंदेबाबाके चाळीस…
मी गुवाहाटीला गेलो. तेव्हा पत्नी मुलांचे फोन आले. परत या म्हटले. आता परत येत नाही असे म्हणत ही संघर्षाची कहाणी असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. ज्याप्रमाणे अलीबाबाके चालीस चोर थे.. तसे आम्ही शिंदेबाबाके चाळीस आहोत या शब्दात इतिहास लिहिला जाईल, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
शिवसेनेतून बाहेर पडल्यावर काही लोक म्हणतात की, तेरा क्या होगा कालिया?…मात्र आमचा गब्बर आहे, अस म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना उत्तर दिलं. परिणामांचा विचार करणारा राजकारणात चालत नाही. संघर्ष जीवनाची यात्रा आहे असं सुद्धा यावेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.