सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहताना पवार म्हणाले की, उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं निधन म्हणजे देशातील तसेच राज्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींसाठी मोठ्या प्रमाणात धक्कादायक बाब आहे. हा अपघात काहीतरी शिकवत आहे. चांगले रस्ते हे जमेची बाजू आहे. पण चांगले रस्ते म्हणून गाडीच्या वेगावरच्या नियंत्रणासंबंधी कुठेतरी विचार करण्याची वेळ आली आहे असे मोठे विधान यावेळी पवार यांनी केले आहे.
शरद पवार पुढे म्हणाले की, देशाच्या आणि विशेषतः हा महाराष्ट्राच्या उभारणीसाठी पारशी समजातील अनेकांचं फार मोठं योगदान आहे आणि त्या योगदान देणाऱ्या लोकांच्या यादीत मिस्त्री ग्रुप हा अत्यंत महत्त्वाचं काम करणार ग्रुप आहे. त्यांनी सुरुवातीला टाटांच्या समवेत खूप मोठं काम केलं. एक काळ असा होता की टाटांच्या ग्रुप मध्ये टाटा पेक्षा जास्त गुंतवणूक मिस्त्री ग्रुपची होती. नंतर रतन टाटा यांनी आपल्या पदातून मुक्तीचा निर्णय घेतला. त्या निर्णयानंतर टाटा ग्रुप च नेतृत्व सायरस मिस्त्री यांच्याकडे गेलं.आणि ते अध्यक्ष झाले.
अतिशय बारकाईने ते काम करत होते दुर्दैवाने त्यांच्यात काही मतभेद झाले आणि त्यांना तो ग्रुप सोडावा लागला. असे असताना त्यांनी टाटामधून राजीनामा दिला आणि ती आपल्या कामाला लागले. सायरस मिस्त्री हे अत्यंत सुस्वाभावी आणि कमीत कमी बोलणारे गृहस्थ होते. कुठेही कटुता असणार नाही याची काळजी ते नेहेमी घेत असत. मिस्त्री कुटुंबातील नवीन पिढीचे ते अत्यंत कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व होते, असेही शरद पवार पुढे म्हणाले.