अहमदाबादहून मुंबईला निघालेल्या सायरस यांच्या कारनं पालघरमधील चारोटी टोल नाका ओलांडला. त्यानंतर एक किलोमीटर अंतर कापल्यानंतर त्यांच्या कारला अपघात झाला. कार भरधाव वेगात असल्यानं आणि चालक द्विधा मनस्थितीत असल्यानं हा अपघात झाल्याचं अपघातस्थळाची पाहणी करणाऱ्या पोलिसांनी सांगितलं.
सूर्या नदीवर दोन पूल आहेत. या दोनपैकी कोणत्या पुलावरून जायचं याबद्दल अनहिता द्विधा मनस्थितीत होत्या. अखेर त्यांनी कार जुन्या पुलावरून नेली. हा पूल नव्या पुलाच्या तुलनेत खाली आहे. कारला अपघात झाला त्यावेळी ती भरधाव वेगात होती. या प्रकरणी कासा पोलिसांनी अहवाल तयार केला आहे.
वैद्यकीय अधीक्षक असलेल्या डॉ. प्रदीप धोडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायरस आणि जहांगीर यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. सायरस आणि जहांगीर मागच्या सीटवर बसले होते. कार दुभाजकाला भरधाव वेगात धडकताच दोघांचं डोकं पुढच्या सीट्सवर आदळलं. डोक्याला झालेल्या गंभीर जखमांमुळेच त्यांचा मृत्यू झाला.
मागे बसलेल्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कर्टन एअरबॅग्स असतात. खिडकीच्या वरच्या भागात या एअरबॅग्स लावलेल्या असतात. सायरस प्रवास करत असलेल्या मर्सिडीज कारमधील या एअरबॅग्स उघडल्या होत्या. मात्र तोपर्यंत फारच उशीर झाला होता. सायरस आणि जहांगीर यांनी सीटबेल्ट लावलेले नव्हते. त्यामुळे कार धडकताच त्यांचं डोकं पुढच्या सीटवर जोरात आपटलं. त्यांनी सीटबेल्ट लावले असते, तर त्यांचं डोकं पुढे आदळलं नसतं. शिवाय एअरबॅग्समुळेही त्यांच्यासाठी रक्षक ठरल्या असत्या.