जिंतूर तालुक्यातील असोला येथील सीमा मारुती पवार (वय २९) या आपल्या पती व सासू सोबत राहतात. पतीला दारू पिण्याचे व्यसन आणि पत्ते खेळण्याची सवय असल्यामुळे सीमा पवार या शेती करून आपली उपजीविका भागवतात. २६ ऑगस्ट रोजी पती मारुती याने पवार यांनी सीमा पवार यांच्याकडे पत्ते खेळण्यासाठी पैसे मागितले. सीमा पवार यांनी पतीला पत्ते खेळण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला असता सासू सरुबाई पवार त्या ठिकाणी आल्या व त्यांनी सीमा पवार यांना अमानुष मारहाण केली.
त्यानंतर सीमा पवार यांचे हात पकडले यावेळी पती मारुती पवार यांनी चुलीतील जळते लाकूड काढून पत्नी सीमा पवार यांच्या मानेवर मारले. त्यामुळे गळा जळाल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यासोबत पतीने मांडीवर देखील चुलीतील पेटलेल्या लाकडाने मारहाण करून जखमी केले. शेजारील व्यक्तींनी सदरील भांडण सोडवली. तर मारहाणीमध्ये जखमी झालेल्या सीमा पवार यांना त्यांचे पती उपचारासाठी देखील घेऊन गेले नाहीत.
परिणामी सीमा पवार यांचे आई-वडील त्यांना बामणी पोलीस ठाणे येथे घेऊन गेले. त्यानंतर त्यांना जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचार सुरु असताना सीमा पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती मारुती पवार सासू सरूबाई पवार यांच्यावर बामणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.