“शिवतीर्थावरच दोन तट पाडून कमळाबाईचा भाजप आज आनंदाने नाचत आहे, पण ते स्वप्नरंजनात दंग आहेत. गुजरातमध्ये अलीकडे मोठ्या प्रमाणात चरस-गांज्यांचे पीक आले आहे. त्या चोरट्या गांजांची नशा मिशन मुंबईवाल्यांना चढली असेल तर शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यातच ती उतरविण्याचे बळ आई जगदंबेने महाराष्ट्रीय मनगटात दिले आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला ललकारलं आहे.
आम्ही मेल्या आईचे दूध प्यायलेलो नाही- लक्षात ठेवा
शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाहीत. मग फोडा-झोडा-मजा पहा. आपापसात झुंज लावा ही ब्रिटिश नीती अवलंबली जात आहे. शिवतीर्थावरच दोन तट पाडून कमळाबाईचा भाजप आज आनंदाने नाचत आहे, पण ते स्वप्नरंजनात दंग आहेत. मराठी माणूस आपसात लढवला जात आहे. कमळाबाईचे हेच तर मिशन होते. ज्यांचे पक्ष कमिशनखोरीच्या मलिद्यावर तरारले आहेत त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? पण हे राज्य शिवरायांचे आहे. येथे बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमानी मर्द मावळे घडवले, ते मेल्या आईचे दूध प्यायलेलो नाहीत याचे भान राखा! बाकी सारे शिवतीर्थावरच! असं सांगत उद्धव ठाकरेच दसरा मेळाव्याला संबोधित करतील, हे आजच्या सामना अग्रलेखातून ठणकावून सांगितलं आहे.
मिशन मुंबई म्हणजे दिल्लीच्या बादशाहीचे ‘कमिशन मुंबई’
आता काय तर म्हणे त्यांचे ‘मिशन मुंबई’ सुरू झाले आहे! हे मिशन मुंबई म्हणजे दिल्लीच्या बादशाहीचे ‘कमिशन मुंबई’ आहे. मुंबईतील मराठी माणसांत फूट पाडायची. त्यासाठी सत्ता आणि पैशांचा वारेमाप उपयोग करायचा. हा त्यांचा कावा. आमचे शिवतीर्थ व त्यांचे शिवतीर्थ वेगळे आहे. आम्ही शिवतीर्थी दसरा मेळावा घेऊन विचारांचे सोने लुटू नये, 56 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुखांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची महान परंपरा खंडित व्हावी यासाठी त्यांचे ‘मिशन’ सुरू आहे.
‘राजकीय’ शिवतीर्थावर भाजपवाल्यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत, त्याचं कारण…..
“अलीकडे म्हणे ‘राजकीय’ शिवतीर्थावर भाजपवाल्यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. त्या काही प्रेमाचा पान्हा फुटला म्हणून नाही, तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेस जितका अपशकून करता येईल तेवढा करावा यासाठीच. शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाहीत. मग फोडा-झोडा-मजा पहा. आपापसात झुंज लावा ही ब्रिटिश नीती अवलंबली जात आहे. अर्थात या बेइमान बाटग्यांचा समाचार घेण्यासाठी महाराष्ट्राची जनता सक्षम आणि सामर्थ्यवान आहे”.