काजीपेट: तेलंगणाच्या काजीपेटमध्ये एका तरुणाला ट्रेननं धडक दिली. धावत्या ट्रेनच्या शेजारून चालत असतानाचा व्हिडीओ तरुणाला चित्रीत करायचा होता. इन्स्टाग्राम रील्ससाठी तरुण व्हिडीओ चित्रीत करत होता. मात्र हा व्हिडीओ त्याला चांगलाच महागात पडला. तरुणाला भरधाव ट्रेननं जोरदार धडक दिली. या धडकेनंतर तरुण हवेत उडाला आणि रेल्वे रुळांच्या बाजूला पडला. अपघातात तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाला. तरुणाचा मित्र त्यावेळी चित्रीकरण करत होता.

गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अक्षय राज असं तरुणाचं नाव असून तो १७ वर्षांचा आहे. वाडेपल्ली येथील महाविद्यालयात तो प्रथम वर्षाला शिकतो. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अक्षय त्याच्या मित्रासोबत रेल्वे रुळांजवळ रील तयार करायला आला होता. मित्रानं चित्रीकरण सुरू करताच अक्षय रेल्वे रुळांजवळ उभा राहिला. त्याच्या मागून भरधाव वेगात ट्रेन आली. ट्रेन आपल्या जवळून अगदी काही इंचांवरून जाईल, असा अक्षयचा अंदाज होता. मात्र त्याचा अंदाज चुकला. ट्रेननं अक्षयला धडक दिली. अक्षय हवेत उडाला आणि खाली पडला. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या जीवाला असलेला धोका अद्याप टळलेला नाही.
अंधेरीत खून, मृतदेह बॅगेत टाकून लोकल प्रवास; नायगावात बॅग फेकली, वैष्णोदेवी गाठली अन् मग…
बिहारच्या कटिहारमध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती. धावत्या ट्रेनसमोर रील तयार करणं दोन तरुणांना महागात पडलं होतं. ट्रेननं दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. बारसोई पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या लहगरिया परिसरात ही घटना घडली. त्या घटनेचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here