Cyrus Mistry Death: टाटा सन्सचे (Tata Sons) माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं रविवारी ४ सप्टेंबर रोजी रस्ते अपघातात निधन झालं. ते गुजरातहून मुंबईकडे येत होते. त्यावेळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून येत असताना पालघरजवळ त्यांचा अपघात झाला. यावेळी कारमध्ये त्यांच्यासह इतर चार लोक होते. सायरस मिस्त्रींसह या अपघातात आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी असल्याची माहिती आहे. देशातील बड्या उद्योगपतींमध्ये सायरस मिस्त्री यांचया नावाचा समावेश होतो. त्यांच्या निधनाने उद्योग जगताला मोठा धक्का बसला आहे. याआधी अनेक नामवंत लोकांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. कलाकार, गायक, राजकीय नेते, अभिनेत्री अशा अनेक जणांचं रस्ते अपघातात निधन झालं आहे.

पंजाबी अभिनेता दीप सिद्धू

१५ फेब्रुवारी २०२२ रोजी पंजाबी प्रसिद्ध अभिनेता संदीप उर्फ दीप सिद्धूचं (Deep Sidhu) कुंडली पलवल मानेसर एक्सप्रेस वेवर रस्ते अपघातात निधन झालं. टोल प्लाझाजवळ त्याची स्कॉर्पियो कार ट्रॉलीला धडकली होती. यात त्याचा मृत्यू झाला, तर त्याची होणारी पत्नी गंभीर जखमी झाली. दीप सिद्धू कुंडली बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान चांगलाच चर्चेत आला होता.

मराठी अभिनेक्षी ईश्वरी देशपांडे

मराठी कलाविश्वातील अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचं (Ishwari Deshpande) २२ सप्टेंबर २०२१ रोजी गोव्यात एका कार अपघातात निधन झालं होतं. हा अपघात गोव्यातील बरदेज तालुक्याजवळ अरपोरा नावाच्या एका भागात झाला होता. ईश्वरीसह तिच्या कारमध्ये तिचा मित्र शुभम देडगेदेखील होता. या अपघातात त्याचाही मृत्यू झाला. त्यांची कार बागा क्रीकच्या खोल पाण्यात बुडली होती. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर या दोघांचे मृतदेह तसंच कार पाण्यातून बाहेर काढण्यात आली होती.

ज्यूनिअर एनटीआरचे वडील आणि टीडीपी नेते नंदमूर हरिकृष्णा

अभिनेता ते राजकारणी झालेले तेलंगानाचे टीडीपी नेते नंदमूरी हरिकृष्ण (Nandamuri Harikrishna) यांचं २९ ऑगस्ट २०१८ रोजी भीषण रस्ते अपघातात निधन झालं होतं. या अपघातात त्यांच्या कारचा चक्काचूर झाला होता. हरिकृष्ण अभिनेते होते त्यांनी अनेक तेलुगू चित्रपटात काम केलं होतं. त्यांची मुलं कल्याणराम आणि तारक रामा राव अर्थात ज्यूनिअर एनटीआर (N. T. Rama Rao Jr.) हेदेखील तेलुगू चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते आहेत.

गोपीनाथ मुंडे

माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचंही भीषण रस्ते अपघातात निधन झालं होतं. ३ जून २०१४ रोजी त्यांच्या कारला अपघात झाला होता. भाजप नेते आणि मोदी सरकारमध्ये मंत्री असलेले मुंडे सकाळी सहाच्या सुमारास त्यांचे सचिव आणि ड्रायव्हरसह एअरपोर्टवर निघाले होते. त्याचवेळी त्यांच्या कारला दुसऱ्या कारने धडक दिली. भीषण अपघातानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अपघातानंतर गोपीनाथ मुंडे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं. या अपघातात त्यांचे सचिव आणि ड्रायव्हर दोघेही बचावले होते.

साहिब सिंह वर्मा

भाजप नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा (Sahib Singh Verma) यांचा २००७ मध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. ते राजस्थानातील सिकर जिल्ह्यातील एका शाळेचं भूमिपूजन करुन दिल्लीला येत होते. त्यावेळी अलवर जिल्ह्यात त्यांच्या कारला समोरुन येणाऱ्या ट्रकने धडक दिली होती. यातच त्यांचं निधन झालं होतं. साहिब सिंह यांचा मुलगा प्रवेश वर्मा भाजप नेते आणि सध्या दिल्लीतून खासदार आहेत.

आनंद अभ्यंकर

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध नाव अभिनेते आनंद अभ्यंकर (Anand Abhyankar) यांचंही रस्ते अपघातात निधन झालं होतं. २३ डिसेंबर २०१२ रोजी मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या कारला अपघात झाला होता. उर्से टोलनाक्याजवळ बऊर गावाजवळ त्यांचा अपघात झाला. यावेळी त्यांच्यासोबत अभिनेता अक्षय पेंडसे (Akshay Pendse) आणि त्याचा दोन वर्षांचा मुलगाही होता. त्यांच्या कारला एका भरधाव टेम्पोने धडक दिली होती. या धडकेत आनंद अभ्यंकरांसह अक्षय पेंडसे आणि त्याच्या दोन वर्षांच्या चिमुकल्याचाही मृत्यू झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here