Haffkine institute Mumbai | विधानसभेतील भंबेरी, पुण्यातील ‘झंझावती’ दौरा आणि आता तानाजी सावंत म्हणतात, हाफकीन नावाच्या माणसाला बॅन करा. तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा सेल्फ गोल करून स्वत:ची अडचण करुन घेतली आहे. पुण्यातील त्यांच्या दौऱ्यावेळी घडलेला एक किस्सा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा प्रकार नक्की घडला की नाही, पण सोशल मीडियावर यासंदर्भातील मेसेज व्हायरल झाले आहेत.

हायलाइट्स:
- तानाजी सावंत यांच्यासाठी आरोग्य खात्याची जबाबदारी डोकेदुखी ठरताना दिसत आहे
- तानाजी सावंत त्यांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा ट्रोल होणार?
- तानाजी सावंत यांनी डॉक्टरांवर प्रश्नांची सरबत्ती केली
सोशल मीडियावर कालपासून एक मेसेज व्हायरल होत आहे. यामध्ये तानाजी सावंत यांच्याबाबत घडलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख आहे. आरोग्यमंत्री झालेल्या तानाजी सावंत यांनी नुकतीच ससून रुग्णालयाला भेट दिली. ससून रुग्णालयात फिरत असताना तानाजी सावंत यांनी आपला मोर्चा रुग्णांच्या दिशेने वळवला. त्यावेळी तानाजी सावंत यांनी डॉक्टरांवर प्रश्नांची सरबत्ती केली. तेव्हा रुग्णालयात औषधे कमी पडत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. हाफकीनकडून वेळेत औषधे मिळत नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले. त्यावर तानाजी सावंत सर्वांदेखत म्हणाले की, तुम्ही त्या हाफकीन माणसाकडून औषधे घेता ते बंद करा. हे वाक्ये ऐकताच डॉक्टरांना हसू आवरत नव्हते. शेवटी तानाजी सावंत यांच्या पीएने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पीएने त्यांना हळूच सांगितले की, हाफकीन ही शासकीय संस्था आहे, माणूस नाही. तेव्हा तानाजी सावंत यांनी तेथून काढता पाय घेतला.
पुण्यातील दौऱ्यावरुन तानाजी सावंतांची नेटकऱ्यांनी उडविली खिल्ली
अलीकडेच तानाजी सावंत यांच्या पुण्यातील दौऱ्याचा कार्यक्रम जिल्हा माहिती कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला होता. मात्र, या दौऱ्याचा तपशील पाहून अनेकांना हसू फुटले होते. दौऱ्याच्या कार्यक्रमात नमूद केल्याप्रमाणे तानाजी सावंत यांच्या दौऱ्यानुसार शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता आपल्या कात्रजच्या निवासस्थानी पोहोचणार होते. त्यानंतर शनिवारी सकाळी ११ वाजता ते कात्रज निवासस्थानाहून निघून बालाजी नगर येथील कार्यालयात दुपारी ३ वाजेपर्यंत उपस्थित राहतील. तर ३ ते ५ या वेळेत बालाजी नगर येथील कार्यालयातून निघून कात्रज येथील कार्यालयात जातील. ५ ते ८ या वेळेत पुन्हा कात्रज कार्यालय ते बालाजी नगर कार्यालयात जातील. रात्री ८ वाजता बालाजी नगर कार्यालयातून निघून आपल्या कात्रज येथील निवासस्थानी जातील, असा एकंदरीत चमत्कारिक दौरा पाहून सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर अशा दौऱ्याने तानाजी सावंत यांची चांगलीच नाचक्की झाली होती.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.