bjp amit shah, मोदींच्या सभा आणि मुंबईची निवडणूक; शिवसेनेकडून चंद्रकांत खैरेंचं अमित शहांना जोरदार प्रत्युत्तर – former shivsena mp chandrakant khaire reply to bjp leader and union home minister amit shah
औरंगाबाद : भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. शिवसेनेतील बंडखोरीनंतर पहिल्यांदाच मुंबईत आलेल्या शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिलं आहे. ‘शिवसेनेने आपल्या जागा पाडून पाठीत खंजीर खुपसला. राजकारणात धोका सहन करू नका, जे धोका देतात, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, मुंबईच्या राजकारणात भाजपचंच वर्चस्व राहिलं पाहिजे, उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा,’ असं आवाहन अमित शहा यांनी मुंबईतील भाजप नेत्यांना केलं आहे. शहा यांच्या या टीकेनंतर शिवसेनाही आक्रमक झाली असून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर आक्रमक पलटवार केला आहे.
‘मुंबई ही मराठी माणसांची, हिंदू बांधवांची आहे. त्यामुळे मुंबईत शिवसेनेच्या १५१ जागा येणार म्हणजे येणारच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीवेळी ४ ते ५ सभा घेतल्या, पण काय झालं? शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची मुंबई आहे. आज हिंदू जनता भाजपवर चिडली आहे. उद्धव ठाकरे हे जमिनीवर आहेत, मात्र तुम्ही हवेत आहात. तुम्हालाच जमीन दाखवावी लागेल,’ असं प्रत्युत्तर चंद्रकांत खैरे यांनी दिलं आहे. काही तास अगोदर अग्यारीत प्रार्थना, चंदनही विकत घेतलं, सायरस मिस्त्रींनी मृत्यूआधीच्या ८ तासांत काय काय केलं?
दरम्यान, भाजपमधील जो उठतो तो टीका करतो, शिवसेनेवर बोलण्याची यांची लायकी आहे का? असा खरपूस सवालही खैरे यांनी विचारला आहे.
अंबादास दानवेही आक्रमक
उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेनंतर शिवसेना नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘अमित शाह यांनी मुंबईत गणपतीचे दर्शन घेतले, मात्र मुंबईवर बेगडी प्रेम दाखवण्याचे काम त्यांनी केलं आहे. मुंबईतील अनेक कार्यालये अहमदाबादला हलवून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे,’ अशी जळजळीत टीका अंबादास दानवे यांनी नाशिक येथे केली.