सायरस मिस्त्री यांचे काही नातेवाईक परदेशातून येणार आहेत. त्यामुळे सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील. सूत्रांच्या माहितीनुसार, वरळी येथील विद्युत दाहिनीत किंवा डुंगरवाडी येथील ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ येथे सायरस मिस्त्री यांच्यावर अंत्यसंस्कार होऊ शकतात.
पारशी समुदायात मृतदेहांवर अंत्यसंस्कार कसे केले जातात?
पारशी समुदाय हा अनेक दशकांपूर्वी भारतात येऊन स्थायिक झाला असला तरी त्यांनी आपली संस्कृती, धर्म आणि अन्य परंपरा कसोशीने जपल्या आहेत. पारशी समुदायात मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करताना दाहसंस्कार आणि मृतदेह पुरला जात नाही. पारशी समुदायाच्या परंपरेनुसार मृतदेह हा स्मशानभूमीत न नेता ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ येथे ठेवला जातो. याठिकाणी गिधाडे हा मृतदेह खातात. अलीकडच्या काळात गिधाडांची संख्या कमी झाली असली तरी पारशी समाजात आजही अंत्यसंस्काराची ही परंपरा टिकून आहे.
मुंबईत मलबार हिलच्या परिसरात ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ आहे. हे ठिकाण चारही बाजूंनी झाडांनी वेढलेले आहे. ‘टॉवर ऑफ सायलेन्स’मध्ये एक लोखंडी दरवाजा आहे. याठिकाणी सूर्यप्रकाशात मृतदेह ठेवले जातात. त्यामुळे मृतदेहांचे विघटन वेगाने होते. तसेच गिधाडं आणि इतर पक्षी हे मृतदेह खातात. आजही अनेक पारशी कुटुंब या पारंपरिक पद्धतीने आपल्या आप्तजनांवर अंत्यसंस्कार करतात. पारशी मान्यतेनुसार मृतदेह जाळणे किंवा तो दफन करणे, हे निषिद्ध आहे.
मृतदेह जाळत किंवा दफन का करत नाही?
पारशी समुदायाच्या मान्यतेनुसार, मृतदेह हा खुल्यावर पक्ष्यांना खाण्यासाठी सोडला जातो कारण, मृत शरीर हे अशुद्ध असते, असा समज प्रचलित आहे. पर्यावरणाच्यादृष्टीने मृतदेह हानीकारक असतो. त्यामुळे अग्नी अपवित्र होऊ शकतो, त्यामुळे मृतदेह जाळत नाहीत. तर मृतदेह पुरल्यास जमीन अशुद्ध होते, अशी धार्मिक भावना आहे. त्यामुळे ‘टॉवर ऑफ सायलेन्स’मध्ये गोलाकार जागेत सूर्यप्रकाश येईल, अशा ठिकाणी मृतदेह सोडले जातात. त्यानंतर गिधाडे हे मृतदेह खातात. यापूर्वी मुंबईत गिधाडांची संख्या जास्त होती. त्यामुळे ‘टॉवर ऑफ सायलेन्स’मधील मृतदेहांचे विघटन वेगाने शक्य होते. परंतु, आता मुंबईतील गिधाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे ‘टॉवर ऑफ सायलेन्स’मधील मृतदेहांचे विघटन होण्यासाठी कित्येक दिवस जावे लागतात. त्यामुळे अलीकडच्या काळात पारशी समुदायाकडून मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सोलार कॉन्सट्रेटरचा वापर केला जातो.
तर दुसरीकडे काही पारशी कुटुंबीयांनी हिंदूंप्रमाणे मृतदेहांवर दाहसंस्कार करायला सुरुवात केली आहे. मृतदेह ‘टॉवर ऑफ सायलेन्स’मध्ये नेण्याऐवजी विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार केले जातात.