सांगली : महाराष्ट्र काँग्रेसमधील अनेक आमदार लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह माजी मंत्री विश्वजीत कदम यांचे नाव देखील चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर विश्वजीत कदम यांनी भाजप प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य केलं आहे.

‘काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षातील कोणीही भाजपमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मी पुन्हा यावर वक्तव्य करणं अपेक्षित नाही,’ असं विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे. ‘आमचे विधिमंडळ पक्षाचे नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस नेत्यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. माजी मंत्री अशोक चव्हाण असतील किंवा इतर नेते असतील त्यांच्या बाबतीत माध्यमात येणाऱ्या बातम्यांबाबत थोरात यांनी वक्तव्य केलं आहे, त्यामुळे त्यावर आता मी बोलू इच्छित नाही,’ असंही कदम यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफीसह मोफत वीज,१० लाख नोकऱ्या, राहुल गांधींच्या गुजरातसाठी मोठ्या घोषणा

विश्वजीत कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असं थेट सांगणं टाळल्याने पुन्हा तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या मतांमध्ये झालेली फूट, त्यानंतर विधानसभेत बहुमत चाचणीवेळी काँग्रेसच्या काही आमदारांची अनुपस्थिती आणि अशोक चव्हाण यांनी उघडपणे व्यक्त केलेल्या नाराजीमुळे काँग्रेस आमदार फुटण्याच्या चर्चांना बळ मिळालेलं आहे. याबाबत आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here