आरोग्यमंत्री झालेल्या तानाजी सावंत यांनी नुकतीच ससून रुग्णालयाला भेट दिली. ससून रुग्णालयात फिरत असताना तानाजी सावंत यांनी आपला मोर्चा रुग्णांच्या दिशेने वळवला. त्यावेळी तानाजी सावंत यांनी डॉक्टरांवर प्रश्नांची सरबत्ती केली. तेव्हा रुग्णालयात औषधे कमी पडत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. हाफकीनकडून वेळेत औषधे मिळत नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले. त्यावर तानाजी सावंत सर्वांदेखत म्हणाले की, तुम्ही त्या हाफकीन माणसाकडून औषधे घेता ते बंद करा. हे वाक्ये ऐकताच डॉक्टरांना हसू आवरत नव्हते. या सगळ्या घटनेचं वृत्त विविध माध्यमांनी छापलं होतं.
हाफकीनबद्दल मी माणसं म्हणून बोललेलं दाखवा, लगेच राजीनामा देतो
तानाजी सावंत म्हणाले, पुणे येथील ससून रुग्णालयाची पाहणी करत असताना काही रुग्णांनी माझ्याकडे तक्रार केली होती. औषध वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी रुग्णांनी माझ्याकडे केल्या होत्या. त्यामुळे आता यापुढे हाफकीनकडून औषध घ्यायची नाहीत, असं मी म्हणालो. दुसऱ्या औषध एजन्सीकडून लवकरात लवकर औषध पुरवठा करू, असं मी सांगितलं. हाफकीन या माणसाकडून औषध घ्यायचं नाही असं मी बोललोच नाही. बोललो असेल तर दाखवा… मी आत्ताच्या आत्ता राजीनामा देतो, असं तानाजी सावंत म्हणाले.
हीच खरी शिवसेना, तिथं काही शिल्लक नाही
राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना असा वाद निर्माण होत आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे नातेपुते, माळशिरस, पंढरपूर, पेनूर, मोहोळ येथे दौरा करून सोलापूर शहरात आले होते. नातेपुते येथून दौरा आटोपून निघाले असता, उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी तानाजी सावंत गेलेल्या रस्त्यावर गोमूत्र शिंपडून रस्त्याचं शुद्धीकरण केलं. याबाबत तानाजी सावंत यांना विचारलं असता ते म्हणाले की, “कोण आहेत ते…? हीच खरी शिवसेना आहे, तिथे काहीच शिल्लक राहिलं नाही”