सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमुळे राजश्री देशपांडे लोकप्रिय झाली. अर्थात याआधीही राजश्रीनं अनेक सिनेमांत काम केलं आहे. तिनं अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत असूनही राजश्री अनेक सामाजिक उपक्रमांतही सहभागी होत असते. राजश्रीनं हाती घेतलेल्या अशाच एका सामाजिक उपक्रमानं सर्वांची मनं जिंकली आहेत.
काय आहे उपक्रम
आजच्या शिक्षक दिनाच्या मुहुर्तावर औरंगाबाद इथल्या ढोरकीन तांड्यावर राजश्रीच्या हस्ते एका जिल्हा परिषदेच्या शाळेचं उद्घाटन करण्यात आलं. विशेष म्हणजे शाळेची ही इमारत राजश्रीनं स्वखर्चाने उभी केली आहे. अंदाजे ५०० लोकसंख्या असलेल्या औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील ढोरकीन तांड्यावरील जिल्हा परिषदेची शाळा मोडकळीस आली होती. शाळेतील काही शिक्षकांनी राजश्रीला संपर्क साधत शाळेची अवस्था सांगितली. त्यानंतर राजश्रीनं त्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं. आश्वासन देऊन राजश्री थांबली नाही तर गावकऱ्यांच्या मदतीनं शाळेच्या इमारतीच्या उभारणीच्या कामालाही सुरुवात केली.
सर्वांच्या अथक प्रयत्नांमधून शाळेची इमारत साकारली. सुसज्ज वर्ग, खेळण्यासाठी मैदान असलेल्या या निसर्गरम्य वातावरणातील शाळेचं लोकार्पण झालं. त्या कार्यक्रमाचे काही फोटो राजश्रीनं तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान, राजश्रीनं मराठवाड्यातल्या पांढरी आणि अमनी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेचाही कायापालट केला होता.