राज्यभरात गणोशोत्सवाची धूम सुरु आहे. राजकीय नेत्यांच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध होते. यंदाच्या वर्षी मात्र कोणत्याही निर्बंधांशिवाय गणेशोत्सव पार पडत असल्याने गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह आहे. दुसरीकडे राज्यातही राजकीय गणितं बदलल्याने नेतेमंडळीही एकमेकांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेत आहेत, यानिमित्ताने त्यांच्यात ‘खास’ संवाद होत आहे.
एकनाथ शिंदे यांनी मैत्रीचा हात पुढे केला, राज ठाकरेंनीही टाळी दिली!
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या आजच्या भेटीला वेगळंच महत्त्व आहे. शिंदेंच्या बंडानंतर संपूर्ण गटच उद्धव ठाकरे यांच्यापासून दुरावला आहे. इकडे राज ठाकरे यांनीही भाजप-एकनाथ शिंदे यांना अनुकुल भूमिका घेताना विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी मविआला झिडकारुन शिंदे-भाजप गटाला मतदान केलं होतं. तसेच राज ठाकरे संधी मिळेल तेव्हा सातत्याने उद्धव ठाकरे यांच्या भूमिकांवर सडकून प्रहार करत आहेत. अशातच गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन चार दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मैत्रीचा हात पुढे केला आणि आज मुख्यमंत्र्यांचं निमंत्रण स्वीकारुन राज यांनी मुख्यमंत्री शिंदेंना टाळी दिली.
चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिवतीर्थावर गेले होते!
राज ठाकरे यांच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक हजेरी लावली. राज यांच्या घरी पहिल्यांदाच दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे आगमन झालं होतं. त्या निमित्त राजकीय क्षेत्रातील अनेक जणांनी उपस्थिती लावली. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनीही राज यांच्या घरच्या बाप्पांचे दर्शन घेतले.
एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरेंची उपस्थिती?
गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची ओळख आणि शान असलेल्या दसरा मेळाव्याबाबत एक मोठा पेच निर्माण झाला आहे. कारण, शिवसेनेपाठोपाठ आता शिंदे गटानेही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे परवानगीचा अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी कोणत्या गटाला परवानगी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे केवळ शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा आयोजित करून थांबणार नाहीत, तर ते या मेळाव्याच्या व्यासपीठावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांना आमंत्रित करू शकतात. शिंदे गटातील सूत्रांच्या माहितीनुसार, राज ठाकरे हे यंदाच्या दसरा मेळाव्याचे प्रमुख अतिथी असू शकतात.