कोल्हापूर : जिल्ह्यात काल ५ दिवसाच्या गणपती बाप्पाला अतिशय भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया-पुढच्या वर्षी लवकर या म्हणत भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन केलं. या सर्वात एक विशेष बाब म्हणजे या वर्षीच्या विसर्जनात कोल्हापूरकरांची एकता आणि शाहू महाराजांची शिकवण दिसून आली. यावर्षी गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने पंचगंगा खळखळाट करत हसत होती तर कोल्हापूरकर नागरिक अख्ख्या महाराष्ट्राला एक नवीन शिकवण घालत होते. नागरिक प्रशासन एकत्र आल्यास काय होऊ शकते? याचं एक उत्तम उदाहरण काल झालेल्या गणपती विसर्जनावेळी पाहायला मिळाले. लोकप्रतिनिधींचा हट्ट झुगारून आपलं शहर हे आणखी सुंदर करण्यासाठी नागरिकांनी २ वर्षापूर्वी सुरू केलेलं पर्यावरण पूरक गणेश विसर्जन यंदाच्या वर्षीही सुरुच ठेवलं. जिल्ह्यात २ लाखांहून अधिक मूर्तींचं पर्यावरण पूरक पद्धतीने विसर्जन पार पडलं.

प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आमने-सामने:

यंदा निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होणार असल्याचं मुखमंत्र्यानी जाहीर केलं. लगोलग इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी यंदाचं गणेश विसर्जन पंचगंगेत होणार असून यासाठी मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्याचं घाईघाईत सांगितलं. आवाडे यांच्या भूमिकेला पर्यावरणवाद्यांचा विरोध सुरू झाला. गेल्या दोन-तीन वर्षापासून पंचगंगा प्रदूषणमुक्तीकडे वाटचाल करत असताना पुन्हा मतांच्या राजकारणासाठी हा निर्णय योग्य नाही असा सूर उमटू लागला. तर हिंदुत्ववादी संघटनांकडूनही आमच्याच सणामुळे फक्त प्रदूषण होत नाही, त्याला अनेक कारणे आहेत, असा मुद्दा उपस्थित केला.

दरम्यान प्रशासनाने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी प्रयत्न करत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयाचे आदेश दाखवत प्लास्टर ऑफ पॅरिसचे आणि त्यावरील केमिकल युक्त रंगाचे दुष्परिणाम सांगत गणेश मुर्तीचं पंचगंगा नदीत विसर्जन करण्यास बंदी घातली. यामुळे लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन असा सामना रंगला. प्रशासनाने पंचगंगा नदी परिसरात बॅरिकेडिंग टाकून मार्ग बंद केले. अतिशय आक्रमकरित्या जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हे निर्णय घेतले.

मात्र विसर्जनाच्या आदल्यादिवशी पर्यावरण मंत्री दीपक केसरकर यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन गेला आणि जिल्हाधिकारी थोडे नरमले. यामुळे आमदार आवाडे यांच्या इचलकरंजीत काही जणांनी थेट पंचगंगेत गणपती मूर्ती विसर्जन केले तर काही जागरूक नागरिकांनी कुंडात विसर्जन केले. मात्र यावेळी एक युवक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला, तो त्याच्या परिवारात एकुलता एक होता. आमदार प्रकाश आवाडे यांच्या हट्टापायी पंचगंगा नदी इचकरंजीत काही प्रमाणात का होईना प्रदूषित झाली. मात्र प्रकाश आवाडे यांचा एवढा अट्टहास का? यामध्ये मतांचे राजकारण तर नाही ना, अशा चर्चा जिल्हाभरात चर्चा सुरु झाल्या.

राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाणार, नव्या मैत्रीचा ‘श्रीगणेशा’ होणार!
कोल्हापुरात मात्र वेगळे चित्र

कोरोना संसर्गानंतर यंदा पहिल्यांदाच निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. मात्र ज्यांनी ही सुंदर सृष्टी निर्माण केली, त्या सृष्टीचं याचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे, म्हणत कोल्हापूरकर गेल्या दोन-तीन वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत आहेत. यासाठी महानगरपलिका, जिल्हा परिषद, पर्यावरण प्रेमी, स्वयंसेवी संस्था एकवटले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदी आहे. गेल्या काही वर्षात पंचगंगा नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्यासाठी जिल्ह्यात अनेक आंदोलन चळवळ सुरू आहेत.

याआधी सर्व कोल्हापूरकर गणेश मूर्तींचं विसर्जन नदीमध्ये करायचे. मात्र दोन-तीन वर्षापासून हेच कोल्हापूरकर गणेशमुर्तींचं विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने ते ही महानगरपालिकेच्या वतीने तयार केलेल्या कुंडात करतात. कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे २ लाख ५८ हजार ९३२ मूर्तींचं संकलन झालं असून १९८६ जणांनी घरातच गणपती विसर्जन केले आहेत. यामुळे काही प्रमाणात का होईना पंचगंगेचं प्रदूषण रोखण्यात कोल्हापूरकरांना यश आलं.

कन्हेरी मंदिरात नारळ फोडला, पवार ५५ वर्ष हरले नाहीत, त्याच मंदिरात बावनकुळे जाणार, ‘बारामती मिशन’ला सुरुवात
कोल्हापूरकरांनी एक पाऊल पुढे टाकले, आता प्रशासनाने पुढे येण्याची गरज

कोल्हापूरकरांनी प्रशासनाला साथ देत आणि पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्यासाठी पर्यावरण पूरक पद्धतीने बाप्पाचं विसर्जन केलं. काल रात्री उशिरापर्यंत मूर्ती खणीत सोडण्याचे काम महानगरपालिकेचे कर्मचारी करत होते. काल कोल्हापूरकरांनी दाखवून दिले इथे फक्त शाहू महाराजांचा विचार चालतो, स्वत:च्या स्वार्थासाठी राजकारण्यांचा हट्ट नाही. मात्र आता महानगर पालिका, प्रदुषण नियंत्रण मंडळाने पंचगंगा नदी, रंकाळा तलाव, कोटीतीर्थ तलावाला प्रदूषण मुक्त करण्यासाठी पुढे यावं आणि नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर त्वरित कारवाई करावी, कोणत्याही परिस्थितीत जलप्रदूषण थांबवावे, अशी मागणी कोल्हापूरकर करत आहेत. लोकांनी त्यांची जबाबदारी पार पाडली आहे, आता जबाबदारी आहे ती महापालिका अन प्रदूषण नियंत्रण मंडळाची…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here