अन्न व औषध प्रशासनाने मंचर येथील महावीर डेअरी अँड स्वीट मार्टने अस्वच्छ परिस्थितीत खवा व गुजरात बर्फी साठवल्यामुळे तसेच चाकण येथील दोन मिठाई विक्रेत्यांनी मिठाई ट्रेवर बेस्ट बिफोर दिनांक नमूद केले नसल्याने कारवाई करण्यात आली आहे.
मांजरी खुर्द येथील मे.आर.एस. डेअरी फार्म या विनापरवाना व्यवसाय करणार्यांवर छापा मारून बनावट पनीरचा साठा जप्त केला. एफडीएच्या वतीने महावीर डेअरी अँड स्वीट मार्ट, मंचर या स्वीट मार्टवर छापा टाकून अस्वच्छ परिस्थितीत साठविलेला खवा व स्वीट खव्याचे (गुजरात बर्फी) दोन नमुने घेऊन उर्वरित २३ हजार ८०० रुपये किमतीचा ११९ किलो खवा आणि ५ हजार ६०० रुपये किमतीचा २८ किलो स्वीट खवा (गुजरात बर्फी) असा एकूण २९ हजार ४०० रुपये किमतीचा साठा जप्त केला.
तर, मांजरी खुर्दमधील कारखान्यावर छापा टाकून १ लाख ९७ हजार ७८० रुपये किमतीचे ८९९ किलो बनावट पनीर, पनीर बनविण्यासाठी वापरण्यात येणारी २ लाख १९ हजार ६०० रुपये किमतीची ५४९ किलो स्किम्ड मिल्क पावडर आणि ४ हजार ५४४ रुपये किमतीचे २८.४ किलो आरबीडी पामोलीन तेल असा एकूण ४ लाख २१ हजार ९२४ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात आला असून, घेण्यात आलेले नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. सर्व मिठाई विक्रेत्यांनी दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या मिठाईच्या ट्रेवर ‘बेस्ट बिफोर’ दिनांक नमूद करावा व मिठाई बनविण्यासाठी भेसळयुक्त स्वीट खवा (गुजरात बर्फी) चा वापर करू नये, दुधापासून बनविलेल्या चांगल्या दर्जाच्या खव्याचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.