Maharashtra Politics | उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचं मुंबई महापालिकेतून ‘विसर्जन’ करण्याचं अमित शाहांचं उद्दिष्ट असल्याची चर्चा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धोका दिला, त्यांना शिक्षा दिल्याशिवाय स्वस्थ बसू नका, असे आदेश अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना दिले होते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकताच मातोश्रीवर शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला

उद्धव ठाकरे
हायलाइट्स:
- सध्याचा काळ संघर्षाचा आहे
- ते शिवसेना संपवायला निघाले आहेत
- नासलेल्या लोकांपेक्षा मूठभर निष्ठावंत कधीही बरे
सध्याचा काळ संघर्षाचा आहे. ते शिवसेना संपवायला निघाले आहेत. निष्ठाही कितीही बोली लावली तरी विकली जाऊ शकत नाही. नासलेल्या लोकांपेक्षा मूठभर निष्ठावंत कधीही बरे आहेत. शिवसेना ही काही आपली खासगी मालमत्ता नाही. मला मुख्यमंत्रीपदाची हाव असती तर मी ते पद क्षणात सोडले नसते. माझ्याकडे तेव्हाही ३०-४० आमदार होते तेव्हाही त्यांना डांबून ठेवले असते. माझी देखील ममता बॅनर्जीकडे ओळख होती त्या आमदारांना तिकडे घेऊन गेलो असतो. किमान कालीमातेच्या मंदिरात नेलं असतं, राजस्थानात त्यांना नेता आलं असत पण तो माझा स्वभाव नाही. त्यामुळे सर्वांना सांगितलं की, दरवाजा उघडा आहे. राहायचं असेल तर निष्ठेने राहा नसेल तर तिकडे जा. आता माझ्यासोबत निष्ठावंत कडवट शिवसैनिक आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार: उद्धव ठाकरे
यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार, असे ठणकावून सांगितले. आता मी फार बोलणार नाही. दसरा मेळाव्यात सगळ्यांचा समाचार घेईन. मुख्यमंत्री पदाचा मास्क असायचा बोलताना जपून बोलावं लागायचं आता तसं नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
‘विचार करूनच भास्कर जाधव यांच्यावर नेतेपदाची जबाबदारी दिलेय’
भास्करराव तुम्हाला शुभेच्छा देतो, तुमच्याकडून माझ्याच नाही तर तमाम शिवसेनेच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या तुम्ही पूर्ण कराल ही मला खात्री आहे. भास्कर जाधवांना विचार करुन नेतेपदाची जबाबदारी दिली. आता लढण्याची वेळ आलीये आणि लढताना मैदानात सर्व विसरुन लढलं पाहिजे, भास्करराव काय करु शकतात, त्याचा झटका त्यांनी त्या १२ जणांना दिलेला आहे, निष्ठा कुणाचीही विकत घेऊ शकत नाही मूठभर निष्ठावान असल्यास मैदान जिंकू शकतो.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.