काही दिवसांपूर्वीच सकल राष्ट्रीय उत्पादनात म्हणजे जीडीपीमध्ये भारताने इंग्लंडला मागे टाकून जगात पाचवा क्रमांक मिळविला. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग पाहता हे एक दिवस होणारच होते. मात्र, इंग्लंडला मागे टाकण्याला एक विशेष अर्थ होता. हे ब्रिटनच्या नेतृत्वाच्या स्पर्धेत जिंकले असते तर भारतीयांना एक आगळा आनंद झाला असता. तो अर्थातच प्रतीकात्मक ठरणारा असता. मात्र, एक भारतीय वंशाचा नेता आणि ‘इन्फोसिस’चे संस्थापक नारायण मूर्ती यांचा जावई हा भारतावर दीडशे वर्षे राज्य केलेल्या ब्रिटनचा पंतप्रधान होऊ शकतो, यात एक ‘काव्यगत न्याया’ची शक्यता होती. त्यामुळेच, ब्रिटनमधील ऋषी सुनक आणि यांच्या अंतिम फेरीकडे भारतीयांचे एरवीपेक्षा जास्तच लक्ष होते. ऋषी सुनक यांनी प्रचाराच्या पहिल्या फेऱ्यांमध्ये चांगली मजल मारली. मात्र, गेल्या दोन आठवड्यांमध्ये पारडे फिरू लागल्याचे दिसत होते. स्वत: सुनक यांनाही त्याचा अंदाज आला होता. गेल्या काही वर्षांत ब्रिटनमध्ये वेगाने सत्तांतरे होत आहेत आणि पुढे-मागे ऋषी सुनक यांच्यासाठी ‘१० डाउनिंग स्ट्रीट’ या पंतप्रधान निवासाचा दरवाजा उघडूही शकतो. ब्रिटनची राज्यव्यवस्था आपण घेतली असली तरी ती पुष्कळ बदलली. तिला अनेक ग्रहणेही लागली. ब्रिटनमध्ये मात्र ‘पक्षाचे सारे सदस्य मतदान करणार, आपल्या पक्षाचा नेता निवडणार आणि तो नेता सरकार स्थापनेचा दावा करणार’ ही व्यवस्था चांगली रुळली आहे. अनेक इच्छुकांमधून नेमके स्पर्धक पुढे येतात. मग मतदान होते. यामुळेच, या निवडीला बराच कालावधी जातो. हुजूर पक्षाच्या एक लाख ७२ हजारांहून अधिक सदस्यांनी मतदान केले. या निर्णायक मतदानात सुनक यांचे ‘अश्वेत’ असणे, हा कळीचा मुद्दा ठरला का, यावर सध्या ब्रिटनमध्ये चर्चा चालू आहे. हुजूर पक्षाचे ज्येष्ठ सदस्य लिझ ट्रस यांचे समर्थक आणि तरुणांचा ओढा ऋषी सुनक यांच्याकडे, असे चित्र साकारत गेले. शेवटी, आजवरचे अतिशय कमी मताधिक्य मिळवून लिझ ट्रस जिंकल्या आहेत.

लिझ ट्रस या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. त्यांच्यासमोर लहानपणी शाळेत भूमिका केलेल्या ‘पोलादी पंतप्रधान’ मार्गारेट थॅचर यांचा आदर्श असला तरी त्यांच्यापुढची आव्हाने कमालीची अवघड आहेत. ब्रिटन ही कागदावर जगातली सहावी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असली तरी आज सारा देश अशांत आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे. नागरिकांचे विजेचे बिल एका वर्षात जवळपास तिप्पट झाले आहे. रेल्वे कामगार, वकील, आरोग्य सेवेतील कर्मचारी व डॉक्टर, शिक्षक, प्राध्यापक हे सारे नाराज आहेत. यातले अनेक संपावर जात आहेत किंवा इशारा देत आहेत. यांना व सगळ्याच नोकरदारांना महागाईभत्ता तातडीने वाढवून हवा आहे. तसो तो वाढविणे म्हणजे नव्या चलनवाढीला निमंत्रण देणे होईल. याचवेळी, ब्रिटनने युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याचा जो निर्णय घेतला; त्याची गुंतागुंत अजून संपलेली नाही. अनेक समान कायदे रद्द व्हायचे बाकी आहेत. त्यातच, युक्रेनच्या युद्धात ब्रिटनने स्वत:ला कमालीचे गुंतवून घेतले आहे. युक्रेनला प्रचंड शस्त्रपुरवठा चालू आहे. त्याचवेळी, रशियाचे इंधनतेल मात्र युरोपला हवे आहे. रशियाने हे तेलाचे भाव आता आणखी वाढवू नयेत, यासाठी अमेरिका व ब्रिटन यांनी नुकतीच संयुक्त मोहीम उघडली आहे.

ब्रिटन असा संकटात असला आणि तेथील नागरिक गांजले असले तरी जगण्याची आशा जोजवत ब्रिटनच्या किनाऱ्याला लागणाऱ्या बेकायदा स्थलांतरितांचे प्रमाण वाढतेच आहे. छोट्या छोट्या होड्यांमधून बायकामुलांना घेऊन यंदा ५० ते ६० हजार निर्वासित ब्रिटनचे दंतुर किनारे गाठतील, असे दिसते. गेल्या वर्षी हे प्रमाण निम्मेच होते. ‘मला अनेक कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत,’ असे लिझ ट्रस यांनी निवड होताक्षणीच पुन्हा एकदा सांगितले हे खरे; पण या निर्णयांची सुरूवात कशी व कुठून करायची, या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही. कधी नव्हे ते ब्रिटनला दुष्काळ आणि ऱ्हस्ववृष्टीचा सामना करावा लागला होता. आता वेधशाळा महापूर आणि अतिवृष्टीचे इशारे देत आहेत. या नैसर्गिक महापुरासोबतच आज अदृश्य असणारी मंदीची लाट येऊन थडकली तर काय करायचे, हा ट्रस यांच्यासमोरचा येत्या काही दिवसांतला सगळ्यांत मोठा पेच असेल. ही मंदी आलीच तर ती लवकर जाणार नाही आणि ब्रिटनची अर्थव्यवस्था खिळखिळी करील; असा इशारा आज तज्ज्ञ देत आहेत. ही सगळी संकटे सावरण्यात लिझ ट्रस यांना यश आले तर त्या केवळ ब्रिटनच्याच नव्हे तर जगातल्या एक यशस्वी राष्ट्रप्रमुख ठरतील. एकेकाळी, ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य कधीही बुडत नसे. म्हणजे पृथ्वीवरच्या इतक्या देशांमध्ये ब्रिटिश साम्राज्य होते. आज साम्राज्य तर सोडाच; खुद्द ब्रिटन गटांगळ्या खातो की काय, अशी अवस्था आली आहे. हे वादळात सापडलेले ब्रिटनचे गलबत लिझ ट्रस वाचवतात का, हे लवकरच कळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here