भारतीय संघाने ज्या प्रकारे पहिल्या १० षटकात फटकेबाजी करुन आश्वासक सुरुवात केली, त्याचा फायदा आम्हाला घेता आला नाही. मला वाटतं की आम्ही १०-१५ धावा कमी केल्या आणि आम्हाला त्याचेच परिणाम भोगावे लागले, असं रोहित शर्मा म्हणाला. ‘संघातील फलंदाजांना समजले पाहिजे की महत्त्वाच्या सामन्यात कोणते शॉट योग्य आहेत आणि कोणते नाहीत, अशा शब्दात रोहितने फलंदाजांचे कान उपटले.
पुढे रोहित शर्मा म्हणाला, “आमचा संघ चांगल्या स्थितीत दिसत होता पण शेवटी आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले. हा पराभवही आवश्यक होता. मात्र, आमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे फिरकीपटूंनी अतिशय चांगली आणि आक्रमक गोलंदाजी करत सामना शेवटच्या षटकापर्यंत आणला. अर्शदीपने देखील मागील सामन्यातइतकीच चांगली गोलंदाजी केली. दुसरीकडे श्रीलंकन संघाचं देखील अभिनंदन करायला हवं, श्रीलंकेने उत्साहाच्या भरात भान हरवलं नाही आणि त्यांनी सामना जिंकला”.
“आम्ही श्रीलंकेच्या फलंदाजांसाठी बऱ्याच रणनीती आखल्या होत्या तसेच त्यांच्यासमोर फिरकीचा अधिक चांगला वापर करण्याचा विचार केला होता पण आम्ही रणनीती पूर्णपणे अंमलात आणू शकलो नाही. गोलंदाजांनी शेवटी दमदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला पण तो आम्हाला त्यात यश आलं नाही, गोलंदाजांचा प्रयत्न पुरेसा ठरला नाही”, असं रोहित शर्मा म्हणाला.
“गेल्या विश्वचषकानंतर भारतीय संघ प्रथमच लागोपाठ दोन सामने हरला आहे. असे पराभव आवश्यक असतात. कारण अशा सामन्यातून खूप काही शिकायला मिळतं. हा पराभव आम्हाला खूप काही शिकवेल”, असंही सरतेशेवटी रोहित म्हणाला.
या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत १७३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेच्या संघाने ६ विकेट्स आणि एक चेंडू शिल्लक राखून भारताला पराभवाचा धक्का दिला. यामुळे टीम इंडियाची फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता बरीच कमी झाली असून भारत आशिया कपमधून जवळपास बाहेर पडला आहे.