मुसळधार पावसामुळे पेणमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. शहरातील पेण एसटी स्टँड, पेण नाका, विक्रम स्टँड, बाजारपेठ, शंकर नगर, हुडको मैदान आदी ठिकाणी पाणी साचले होते. तसंच मुसळधार पावसाने हेटवणे धरण, बाळगंगा धरण यासह भोगावती नदी दुथडी भरुन वाहत आहेत.
तालुक्यातील भाल, दादर, रावे, वढाव, अंतोरे, गडब या गावांच्या जवळ पाण्याची पातळी वाढल्याने शेतजमीन पाण्याखाली जाऊन शेतीचे नुकसान झालं आहे. मुसळधार पावसाने ग्रामीण व शहरी भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत होऊ शकलेला नव्हता.
रायगड जिल्ह्यात सर्वत्र ढग भरून आल्याने सायंकाळीच अंधार पडला होता. जिल्ह्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला. समुद्र, खाडीकिनारी नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिलेले आहेत. खबरदारी म्हणून समुद्रात गेलेल्या महाराष्ट्रासह गुजरातमधील मासेमारी नौका दिघी, आगरदांडा किनार्यावर येऊ लागल्या आहेत.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातही दापोली,खेड, चिपळूण तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.