Buldana news : जिल्हा परिषदेच्या शाळेत खुद्द मुख्याध्यापकानेच आपल्या शाळेतील पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला आहे. जिल्ह्यात विद्यार्थिनींवरील लैंगिक अत्याचाराची तिसरी घटना आहे.

हायलाइट्स:
- जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकाकडून मुलीवर अत्याचार
- पाचवीत शिकणाऱ्या मुलीला केबीनमध्ये बोलावून केला अत्याचार
- बुलडाण्यातील नांदुरा तालुक्यातील मुरंबा गावातील घटना
विशेष बाब म्हणजे ही घटना शिक्षक दिनीच घडल्याने आता सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. मुरुंबा हे छोटसं गाव आहे. या गावात पाचवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेवर दोन शिक्षक असून एक शिक्षक अकोला येथून ये-जा करतात व दुसरे मुख्याध्यापक देविदास दिघोळे हे शेगाव येथून ये-जा करतात. दरम्यान, शिक्षकदिनी दुसरे शिक्षक शाळेवर आले नसल्याचे पाहून आरोपी मुख्याध्यापक देविदास दिघोळे याने पाचवीत शिकणाऱ्या एका मुलीला आपल्या केबिनमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार केला त्यानंतर ‘कुणालाही सांगू नको’ अशी धमकीही दिली.
मात्र, मुलीने आपल्या आईला घटना सांगितल्यावर पालकांनी व गावातील नागरिकांनी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन गाठून या नराधम मुख्याध्यापकाची तक्रार केली आहे. यावरून पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आरोपी मुख्याध्यापक कालपासून फरार होता. आज त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बुलढाणा जिल्ह्यात शिक्षकांकडून आपल्याच विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराच्या एकाच महिन्यात तीन घटना समोर आल्याने आता मात्र शिक्षकी पेशाला काळिमा फासला आहे. पालकांमध्ये व समाजात शिक्षकांप्रती जनभावना उफाळून येत आहेत व पालकांना आपल्या चिमुरड्याना शाळेत पाठवायला भीती वाटत आहे.
आदिलशहा, कुतुबशहाप्रमाणे अमित शाहांना परत पाठवू, अंबादास दानवेंची टीका
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.