मालिका क्षेत्राविषयी मला नितांत आदर आणि श्रद्धा आहे. या क्षेत्रानं मला भरभरून दिलंय. त्यामुळे मालिकांपासून दूर राहावंसं मला वाटत नाही. पण मला सध्या पूर्ण वेळ मालिकेला देणं शक्य नव्हतं. थोड्या कालावधीच्या कामाची मी वाट पाहत होतो. ‘बस बाई बस’ या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा टीव्हीविश्वाकडे वळण्याची माझी इच्छा पूर्ण झाली.
आव्हानात्मक काम
मी गप्पांमध्ये रमणारा नाही. पण या कार्यक्रमात मला अनोळखी स्त्रियांशी बोलायचं आहे. संहिता, संवाद यांच्या पलीकडे जाऊन मला हे काम करायचं आहे. त्यामुळे बोलणं हा स्थायीभाव असणाऱ्या महिलांना नेमकेपणानं बोलतं करणं हे आव्हान होतं. या कार्यक्रमात येणाऱ्या महिलांकडून त्यांच्या आयुष्याचा प्रवास समजून घेतल्यावर माझ्यातही काही चांगले बदल होतील, अशी आशा आहे.
प्रेक्षकांसाठी संधी
आज महिला सर्वच क्षेत्रात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या निभावताना दिसताहेत. अशाच विविध क्षेत्रातील मान्यवर महिला या कार्यक्रमात सहभागी होताहेत. सर्वसामान्य गृहिणींचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पाच महिला आमच्याबरोबर असतात. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सहभागी पाहुण्या महिला दिलखुलासपणे देतात. त्यातून त्यांचं आयुष्य, विचार, संघर्ष समजून घेण्याची संधी प्रेक्षकांना मिळतेय.
कुटुंबासाठी ठरवून सुट्टी
करिअरच्या सुरुवातीच्या काळात कामातून सुट्टी मिळणं शक्य नव्हतं. पण आता मुलांच्या, पत्नीच्या आणि आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला मी आवर्जून सुट्टी घेतो. आयुष्यातले हे महत्त्वाचे क्षण कुटुंबाबरोबर घालवायला मला आवडतं. काही वर्षांपासून मी ठरवून सुट्टी घेतो आणि कुटुंबासह फिरायला जातो. आमची मुलं भविष्यात शिक्षण किंवा कामानिमित्त कुठे असतील हे माहिती नाही. त्यामुळे आताचे क्षण सुंदर करून भरभरून जगण्याकडे आमचा कल असतो.
समृद्ध सहवास
प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक विजय तेंडुलकर यांच्याशी माझे फार वेगळे संबंध होते. थिएटर अकादमीत असताना मी त्यांचा ‘सफर’ हा दीर्घांक करत असताना त्यांच्याशी ओळख झाली. ते कायम समोरच्याच म्हणणं ऐकून घ्यायला प्राधान्य द्यायचे. १०-१२ वर्षांच्या आमच्या मैत्रीतला तेंडुलकरांचा सहवास मला समृद्ध करणारा होता.
निखळ मनोरंजनाची जबाबदारी
आजचा काळ आत्मचिंतनाचा असून संख्येनं कमी झाले तरीही चित्रपटाच्या दर्जावर काम व्हायला हवं. मराठी चित्रपटानं सामाजिकतेची झूल बाजूला ठेवायला हवी. प्रेक्षक महिन्याच्या पगारातून काही रक्कम बाजूला काढून चित्रपटाला येतो. त्याला शिकविण्यापेक्षा आनंद देण्याची जबाबदारी चित्रपटाची असते. दक्षिणेतील ‘आरआरआर’, ‘पुष्पा’ अशा चित्रपटांनी सामाजिक आशयापेक्षा मनोरंजनाला प्राधान्य दिल्यामुळे ते चालू शकले. त्यामुळे मराठी चित्रपटानं प्रबोधनाचं अतिरिक्त ओझं आपल्याबरोबर बाळगू नये.
भाषिक अस्मितेवर ठाम
दक्षिणेत मल्याळी चित्रपट चांगला चालण्याचं मुख्य कारण म्हणजे ते त्यांच्या भाषिक अस्मितेशी तडजोड करत नाहीत. अशाप्रकारे आपल्या भाषेवर ठाम रहायला मराठी माणसाला जमेल का, हा मूळ प्रश्न आहे.
स्त्री-कलाकारांवरील ट्रोलिंगचा राग
समाजमाध्यमांवर होणारं ट्रोलिंग भयंकर आहे. विशेषतः महिला कलाकारांवर होणारं दर्जाहीन ट्रोलिंग पाहून मला प्रचंड राग येतो. तसंच कोणत्याही बाबतीत आपलं मत व्यक्त केल्यावर ठरावीक एका बाजूचा गट टीका करतोच. या भीषण स्थितीमुळेच मी काही काळापूर्वी ट्विटरपासून दूर राहू लागलो. आता मी समाजमाध्यमांवर व्यक्त होत नाही.
भूमिकेत अडकत नाही
एखाद्या भूमिकेत मी कधीच अडकून राहत नाही. कामापुरतं त्या व्यक्तिरेखेला माझं शरीर, मन मी वापरायला देतो. प्रयोग संपला किंवा पॅकअप झाल्यावर मी सुबोध भावेच असतो. भूमिकेतून बाहेर पडणं तितकं कठीण नसतं; पण एखाद्या भूमिकेला स्वतःत सामावून घेणं अवघड आहे. आपली आणि त्या भूमिकेची स्वभाववैशिष्ट्यं भिन्न असल्यानं त्या भूमिकेशी एकरूप होताना दिग्दर्शकाचं मार्गदर्शन महत्त्वाचं असतं.
उत्तम अभिनेत्यांना वाव
वेब माध्यमांचा सर्वाधिक फायदा हा भारतातील प्रतिभावान कलावंतांना झाला आहे. हिंदीतील कलाकार वेब मालिकांत प्रमुख भूमिकांमध्ये दिसू लागलेत ही सकारात्मक बाब आहे. चित्रपटात त्यांना सहायक भूमिकांशिवाय पर्याय नसतो. पण आता त्यांच्या नावावर वेब मालिका पाहिल्या जातात.
शिवाजीरावांनी वाचवला जीव
अनेक वर्षांपूर्वी दिवाळीच्या आदल्या दिवशी साताऱ्यावरून पुण्याला येत असताना कात्रजच्या घाटात आमच्या नाटकाची बसची उजव्या बाजूने घासली गेली. कारण आमच्या बसचे ड्रायव्हर शिवाजीरावांना गाडीचे ब्रेक निकामी झाल्याचं समजलं होतं. त्यांनी प्रसंगावधान राखून गाडी दरीच्या उलट्या दिशेला फिरवली आणि आम्हा सर्वांचा जीव वाचवला. शिवाजीरावांमुळे ती दिवाळी आम्ही पाहू शकलो!
शब्दांकन : पार्थ डोंगरे, वझे-केळकर कॉलेज