अहमदनगर :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केलेल्या आमदार-खासदारांच्या जागांवर भाजप दावा करणार नाही, असं सांगण्यात येत असलं तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी अशा जागांवरही भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे शिंदे गटात गेले आहेत. तरीही या मतदारसंघात भाजपने शत प्रतिशत भाजपचा नारा देत तयारी सुरू केली आहे. हा मतदारसंघ पक्षाच्या लोकसभा प्रवास योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. त्यानुसार १० ते १३ सप्टेंबर या काळात केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल या मतदारसंघात येणार असून प्रत्येक तालुक्यात दौरा करणार आहेत.

याच मतदारसंघावर रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी दावा केला आहे. खासदार लोखंडे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेकडून माजी मंत्री बबनराव घोलप यांना संभाव्य उमेदवार मानले जात असून त्यांनीही तयारी सुरू केली आहे. त्यामुळे शिंदे गटात गेलेले लोखंडे शिंदे गटाकडून उमेदवार असणार की तेच भाजपमध्ये प्रवेश करून भाजपचे उमेदवार असणार? असा प्रश्न आहे. तर दुसरीकडे आठवले यांना जागा सोडण्यासंबंधी काय निर्णय होणार, हेही अद्याप स्पष्ट झालेलं नाही. असं असलं तरी भाजपने मात्र स्वत:साठी या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे.

नवनीत राणांचा लव्ह जिहादचा दावा खोटा?, मुलीचा पोलिसांना जबाब, ‘माझ्या वैयक्तिक…!’

राज्यात दुसऱ्या पक्षांकडे असणाऱ्या १४ लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून आणण्यासाठी संघटनात्मक पातळीवर काम सुरू झाले आहे. त्यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आला आहे. पक्षाच्या वतीने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख आणि आ. डॉ राहुल आहेर यांना प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

‘राजेशाही असती तर हे होऊ दिलं नसतं’; याकुब मेमन कबरीच्या सुशोभीकरणावर उदयनराजे संतापले

लोकसभा मतदारसंघात संघटनात्मक कामाबरोबरच केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला जात असून बूथ स्तरापर्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पुढील १७ महिने काम करून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाजपचा खासदार निवडून आणाण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत लोकसभा प्रवास योजनेतील विविध कामावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.

दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल पुढील तीन दिवस शिर्डीत येत आहेत. या दौऱ्यात अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा या तालुक्यात मंत्री प्रल्हाद पटेल जनसंघ, भाजप पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी योजनांचे लाभार्थी यांच्याशी थेट गावात आणि बूथ स्तरापर्यंत जाऊन संवाद साधणार आहेत. मतदारसंघात केंद्र सरकारच्या योजनांच्या झालेल्या अंमलबजावणीचा आढावाही शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here