बंडू येवले | लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाटातील खोपोली एक्झिट जवळील तीव्र उतारावर भीषण अपघात झाला आहे. कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्यामुळे कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरने पुढे जाणाऱ्या एका इर्टिगा कारला धडक दिली आणि त्यानंतर कंटेनर मार्गाच्या कडेला उलटून अपघात झाला. या अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून कार चालक किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास झाला आहे. अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

परशुराम कुंडलिक आंधळे (वय-२४, रा.लिंबोडीकर, आष्टी, बीड) असं अपघातात मृत्यू झालेल्या कंटेनर चालकाचं नाव आहे.

Ganpati visarjan: गणरायाच्या निरोप सोहळ्यासाठी वाहतुकीच्या मार्गात बदल, मुंबईतील ७४ रस्ते बंद राहणार

बोरघाट (दस्तुरी) महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरचे (क्रमांक- एमएच-४३/वाय-५८४१) खोपोली एक्झिट जवळील तीव्र उतारावर ब्रेक निकामी झाल्यामुळे कंटेनर चालकाचे कंटेनरवरील सुटले अन् कंटेनर पुढे जाणाऱ्या इर्टिगा (क्रमांक-एमएच-४३/बीयू-२१४५) कारवर मागून जोरात धडकला. तसंच कंटेनर मार्गाच्या कडेला उलटून पलटी झाला. यावेळी कंटेनर चालकाने गाडी मधून मारली होती.परंतु तो गाडीखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालक किरकोळ जखमी झाला आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच बोरघाट (दस्तुरी) महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक महेश चव्हाण यांनी सहकाऱ्यांसह तसंच देवदूत आपत्कालीन पथक व आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. पोलिसांनी देवदूत आपत्कालीन पथक व आयआरबीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने अपघातग्रस्त कंटेनर व कार क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या घटनेचा पुढील तपास खोपोली पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here