अमरावती: अमरावतीच्या लव्ह जिहाद आरोप प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळालं आहे. ज्या प्रकरणावरुन खासदार नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशनमध्ये जोरदार राडा केला, गोंधळ घातला, प्रसंगी पोलिसांसमोरच २० मिनिटे थयथयाट केला. त्याच प्रकरणातल्या मुलीने नवनीत राणा यांनी माझी बदनामी केली, असा गंभीर आरोप केलाय. काल संबंधित मुलीने पोलिसांकडे जबाब नोंदवताना ‘लव्ह जिहाद’वगैरे असा काही प्रकार नसल्याचं सांगत माझ्या वैयक्तिक कारणांनी मी घर सोडून निघून गेले होते, असं सांगून राणांना तोंडघशी पाडलं. तर आज नवनीत राणांवर बदनामीचा आरोप करुन त्यांना आणखीनच अडचणीत आणलं.

एका विशिष्ट धर्मातील युवकाने मुलीचे अपहरण केल्याच्या आरोप प्रकरणातील बेपत्ता मुलगी बुधवारी रात्री उशिरा सातारा येथे सापडली आहे. अमरावती पोलिसांनी सातारा पोलीस आणि पुणे जीआरपी पोलिसांना सूचना दिल्यावर प्रवास करत असलेल्या ट्रेनमधून मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. अपहरण झाल्याच्या आरोपानंतर अमरावती शहरात वाद निर्माण झाला होता. बुधवारी दिवसभर यावरून वातावरण तापलेले असतानाच नवनीत राणा यांनीही राजापेठ पोलिस स्टेशनमध्ये सुमारे २० मिनिटे गोंधळ घातला. पोलिसांवरही अनेक आरोप केले. मात्र तरुणीच्या कालच्या जबाबाने याप्रकरणाला नवीनच वळण मिळाले.

Video: अमरावतीत लव्ह जिहादचा आरोप, नवनीत राणांचं रौद्ररुप, पोलीस स्टेशनमध्ये २० मिनिटे राडा
राणांनी बदनामी केली, पोलिसांनी खोटी माहिती दिली, लव्ह जिहाद वगैरे काहीच नाही!

अमरावतीचं संपूर्ण प्रकरण लव्ह जिहादच असल्याचं भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आणि खासदार नवनीत राणा यांनी ठासून सांगितलं. मात्र पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतल्यानंतर तिचा साताऱ्यात आणि अमरावतीत जबाब नोंदवला. यावेळी मुलीने माझ्यासोबत कोणताही प्रकार अनुचित प्रकार घडला नसल्याचं सांगितलं. मी माझ्या काही वैयक्तिक कारणांनी गेली होती. मला कोणीही पळवून नेलं नव्हतं. माझी बदनामी थांबवा, असं सांगत खासदार नवनीत राणा यांनी खोटी माहिती दिली असल्याचा आरोप देखील संबंधित तरुणीने केला आहे.

नवनीत राणांचा लव्ह जिहादचा दावा खोटा?, मुलीचा पोलिसांना जबाब, ‘माझ्या वैयक्तिक…!’
नवनीत राणा तोंडावर पडल्या!

राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १९ वर्षीय वयाची युवती मंगळवारी रात्री बेपत्ता झाली. त्यासंदर्भात तरुणीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनीही तरुणीचा शोध घेण्यासाठी तातडीने सूत्रे फिरवली. पण त्याचदरम्यान खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणावरुन राडा घातला. शहरातील आंतरधर्मीय विवाह व लव्ह जिहाद प्रकरणातील मुलाशी थोडा कठोर व्यवहार करा, असे सांगण्यासाठी फोन केल्यानंतर मनीष ठाकरे यांनी आपला कॉल रेकॉर्ड केला. त्याबाबत जाब विचारण्यासाठी आपण पोलीस ठाण्यात दाखल झाल्याचे राणा म्हणाल्या. यादरम्यान पोलीस आणि खासदार राणा यांच्यात जोरदार धुमश्चक्री उडाली. दोन दिवस या संपूर्ण प्रकरणाची राज्यात जोरदार चर्चा झाली.

पोलिसांनी या प्रकरणात एका संशयित युवकाला ताब्‍यात घेऊन चौकशी सुरू केली होती, पण युवकाने आपण अपहरण केले नसल्‍याचे सांगितले. मात्र खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांनी ठणकावून हा लव्ह जिहादचाच प्रकार असल्याचं सांगितलं. पोलिसांनी चौकशी सुरु असल्याचं सांगत आम्हाला आणखी थोडा वेळ द्या, असं म्हटलं. मात्र नवनीत राणा काही केल्या ऐकायला तयार नव्हत्या. त्यांनी संबंधित मुलीला आताच्या आत्ता आमच्यासमोर आणा, असं सांगत पोलिसांशी जवळपास २० मिनिटे हुज्जत घातली. मात्र आता तरुणीच्या जबाबानंतर त्या चांगल्याच तोंडघशी पडल्याची चर्चा अमरावती शहरासह राज्यभरात सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here