यावेळी रवी राणा यांनी अमरावती पोलिसांवर आगपाखड केली. संबंधित तरुणी सापडण्यात अमरावती पोलिसांची कुठलीही कामगिरी नाही. सातारा रेल्वे पोलीस व सातारा पोलिसांनी ही मुलगी शोधली. यामध्ये अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांचे काहीच कर्तृत्त्व नाही. उद्धव ठाकरे सरकारमध्ये पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी केवळ वसुली केली. हे वसुली पथक आता देवेंद्र फडवणीस व शिंदे सरकार मध्ये बंद होणार आहे. तसेच गणपतीनंतर आरती सिंह यांची उचलबांगडी होईल, असा सूचक इशारा रवी राणा यांनी दिला.
नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात आदळआपट केल्याच्या दुसऱ्याच दिवशी संबंधित तरुणी सापडली होती. यानंतर अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी तरुणीने दिलेल्या जबाबाविषयी माहिती दिली होती. काही कारणांनी रागाच्या भरात मी घर सोडलं होते, असा खुलासा संबंधित तरुणीने केल्याचे आरती सिंह यांनी सांगितले होते. त्यामुळे नवनीत राणा यांचा लव्ह जिहादचा मुद्दा निकाली निघाला होता.
अमरावतीमध्ये पोलीस संघटना नवनीत राणा यांच्याविरोधात आक्रमक
अमरावतीत महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेच्या वतीने नवनीत राणांचा निषेध करण्यात आला. पोलिसांच्या समर्थनार्थ पोलीस कुटुंबिय रस्त्यावर उतरले. अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन मध्ये एका युवतीच अपहरण झाल्याचा आरोप करत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावती शहरातील राजपेठ पोलीस ठाण्यात पोलिसांसोबत हुज्जत घालून राडा केला होता. पोलिसांना अपमानास्पद वागणूक खासदार नवनीत राणा यांनी दिली. तसेच त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे आज राजापेठ पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेच्या वतीने नवनीत राणा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी नवनीत राणा यांचा निषेध करण्यासाठी पोलीस कुटुंबीय मोठ्या प्रमाणावर रस्तावर उतरले होते. त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नवनीत राणा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे व वारंवार पोलिसांबद्दल अपमानास्पद बोलणे हे त्यांनी टाळावं व त्यांनी तात्काळ पोलिसांची माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र पोलीस भरती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.