वाघाने कालच घेतला एकाचा बळी
मशरूम गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या इसमाला वाघाने ठार केल्याची घटना ८ सप्टेंबर सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास देसाईगंज तालुक्यातील उसेगाव नजीक घडली होती. प्रेमपाल तुकाराम प्रधान ( ४५) रा. उसेगाव असं वाघाच्या हल्ल्यात काल ठार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
सीटी १ नामक हा वाघ आहे. विशेष म्हणजे नुकतंच या वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून विशेष पथक या परिसरात दाखल झाले. परंतु याच वाघाने इसमाचा बळी घेतला. देसाईगंज व आरमोरी तालुक्यात सध्या सीटी १ या वाघाचा वावर असल्याने वनविभागाने नागरिकांना जंगलात जाण्यास मनाई केली आहे. असं असतानाही प्रेमपाल हा एका मित्रासह काल ८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास जंगलात मशरूम गोळा करण्यासाठी गेला होता.
दरम्यान, जवळच दबा धरून बसलेल्या सीटी १ या वाघाने प्रेमपालवर हल्ला करून त्यास ठार केले. आज पुन्हा एका इसमाला वाघाने ठार केलं असून जिल्ह्यात वाघाचे हल्ले वाढल्याने नागरिकांमधून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.