अहमदनगर : शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिवसेनेतील दोन गटांमध्ये वाद झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा डीजे हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मानणाऱ्या गटाच्या पुढे घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. परंपरेनुसार शिवसेनेचा डीजे मिरवणुकीत १४ व्या क्रमांकावर असतो, मात्र त्याजागी शिवसेनेच्या शिंदे गटाचा डीजे पुढे घेतल्याने ठाकरे गट आक्रमक झाला होता.
जर नवीन मंडळांना मिरवणुकीत सहभागी व्हायचं असेल तर परंपरेनुसार ठरवून दिलेल्या क्रमांकाच्या मागे मिरवणुकीत सहभागी व्हावं, यावर ठाकरे गट ठाम होता. त्यानंतर अखेर ठाकरे गटाचा डीजे मिरवणुकीत पुढे घेण्यात आला आणि मिरवणूक सुरळीत सुरू झाली. शिंदे गटाकडून रीतसर मिरवणुकीसाठी परवानगी मागण्यासाठी अर्ज करण्यात आल्याने पोलीस प्रशासनापुढे पेच निर्माण झाला होता. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र पोलीस प्रशासनाने योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळत मिरवणूक पुन्हा सुरू केली.