कॅनबेरा: ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांमधील कर्णधार ऍरॉन फिंचनं एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. उद्या म्हणजेच ११ सप्टेंबरला न्यूझीलँडविरुद्ध शेवटचा सामना खेळेल. उद्या ऑस्ट्रेलियन संघ किवींविरोधात तिसरा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. या सामन्यात फिंच कांगारुंचं नेतृत्त्व करेल. खराब फॉर्मशी झगडत असल्यानं फिंचनं एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
फिंच उद्या १४६ वा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असली तरी फिंच टी-२० मध्ये खेळताना दिसेल. २०२१ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत फिंचच्या नेतृत्त्वाखाली खेळताना ऑस्ट्रेलियानं जेतेपद पटकावलं. फिंच आतापर्यंत ९२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. ५ कसोटी सामन्यांत त्यानं ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. विराट कोहलीने दोन व्यक्तींना समर्पित केलं पहिलं शतक, म्हणाला ‘ मला धक्का बसला अन् वाटलं…’ गेल्या काही महिन्यांपासून फिंचची बॅट शांत आहे. यावर्षी झालेल्या १३ एकदिवसीय सामन्यांत त्याला केवळ १३ च्या सरासरीनं धावा करता आल्या आहेत. ५ वेळा तो शून्यावर बाद झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही त्याला भोपळा फोडता आला नाही. त्यामुळे फिंचच्या नावावर नकोसा विक्रम जमा झाला आहे. एका कॅलेंडर वर्षांत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा ऑस्ट्रेलियन कर्णधार म्हणून फिंचची नोंद इतिहासात होईल.
आतापर्यंत फिंच १४५ एकदिवसीय सामने खेळला आहे. त्यात त्यानं १७ शतकं आणि ३० अर्धशतकं झळकावली आहेत. ३९ च्या सरासरीनं त्याच्या नावावर ५ हजार ४०१ धावा जमा आहेत. टी-२० मध्ये त्याच्या नावावर २ शतकं आणि १७ अर्धशतकं आहेत. टी-२० मध्ये त्यानं २ हजार ८५५ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये फिंच एकूण ९२ सामने खेळला असून त्यात त्यानं २ हजार ९१ धावा केल्या आहेत. त्यानं १५ अर्धशतकं साजरी केली आहेत.