Ganesh Visarjan 2022 : गणपती विसर्जन (Ganesh Visarjan) मिरवणुकीवेळी राज्यात अनेक ठिकाणी विघ्नाचं गालबोट लागलं आहे. विसर्जनावेळी काही ठिकाणी गोंधळ झाल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी दुर्घटना देखील घडल्या आहेत. गणपती विसर्जनावेळी राज्यभरात बुडून सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमध्ये वर्धा जिल्ह्यात तीन जणांचा, यवतमाळ जिल्ह्यात दोन जणांचा तसेच ठाणे आणि धुळ्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच यावेळी अनेकजण जखमी झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

गणपती विसर्जनसाठी गेलेल्या दोन तरुणाचा यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील महागाव इथे बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. सोपान बबन गावंडे (16), गोकुळ दत्ता टेटर (17) (दोघेही रा. महागाव) अशी मृतकांची नावे आहे. दोघेही गणपती विसर्जनसाठी महागाव नजिकच्या नाल्यावर गेले होते. सोबतचे लोक परत आले, परंतू ही दोन मुले परत आली नाहीत. तेव्हा गावकरी आणि नातेवाईक शोध घेण्यासाठी नाल्यावर गेले, असता दोघे पाण्यावर तरंगताना आढळून आले. त्यांना लगेच उपचारासाठी आर्णी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. तिथे सोपानला आर्णि येथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर गोकुळ टेटर याला पुढील उपचारासाठी यवतमाळ पाठवण्यात आले होते. मात्र, त्याचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

गणपती बाप्पाला निरोप देत असताना धुळ्यात गणेश विसर्जनाला गालबोट लागले आहे. एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. राकेश आव्हाड असं या तरुणाचं नाव असून आनंदखेडे गावात ही घटना घडली आहे. तर वर्ध्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तसेच ठाणे आणि धुळ्यात एकाचा मृत्यू झाला आहे. पनवेलमध्ये विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागलं आहे. जनरेटरमधून गेलेली वायर तुटल्याने 11 जण जखमी झालेत, पनवेल कोळीवाडाच्या विसर्जन घाटावर ही दुर्घटना घडली. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून 7 ते 8 जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. जखमींमध्ये एका 9 महिन्याच्या चिमुरडीचाही समावेश आहे. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. 

विसर्जनादरम्यान चंद्रपूरचा राजा गणेश मंडळावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. रात्री 2 च्या दरम्यान खोब्रागडे कॉम्प्लेक्स जवळ लाठीचार्ज करण्यात आला. लाठीचार्जमुळं मंडळाच्या काही कार्यकर्त्यांना किरकोळ दुखापत झाली. यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर गणेश मूर्ती ठेवून रास्ता रोको केला. पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन  कार्यकर्त्यांची समजूत काढली. 

पुण्यात भाजपचे माजी नगरसेवक दीपक पोटे यांचे नवनाथ गणेश मंडळ कुमठेकर रस्त्यावरुन दोन तास जागेवरुन हललेच नाही. त्यामुळे पाठीमागील मंडळे पुढे जाऊ शकली नाहीत. पाठीमागील मंडळांनी, पोलिसांना आणि प्रशासनाला वारंवार विनंती करुनही पोटे यांचे मंडळ ऐकत नव्हते. त्यामुळं स्वतः पोलीस आयुक्त मंडळाचा डीजे बंद करण्यासाठी गेले. मात्र, तरीही दीपक पोटे यांनी मंडळ अलका चौकात येताच महापालिकेच्या स्टेजवर जाऊन माईक स्वतः हातात घेतला आणि डीजे लावण्याचे आदेश दिले. त्यामुळं पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे स्वःत महापालिकेच्या स्टेजवर गेले आणि त्यांनी डीजे बंद करण्यास सांगितले. त्यानंतर पोटे यांचे गणेश मंडळ रात्री बारा वाजता पुण्यातील अलका चौकातून विसर्जनासाठी पुढे गेले.

पुणे शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील ढोल ताशा पथकांमध्ये पडलेल्या अंतरामुळे विसर्जनासाठी वेळ लागत आहे. पोलिसांकडून सकाळपासून मंडळांना पुढे ढकलण्यात येत आहे. मिरवणूक वेळेत संपवण्यासाठी पोलीस प्रशासनाचा प्रयत्न सुरु असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. विसर्जन मिरवणूक वेळेत संपवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. त्यादृष्टीने संबंधित मंडळांसोबत झालेल्या बैठकांमध्ये सूचनाही देण्यात आल्या होत्या. पण ढोल ताशा पथकांमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर पडल्याने मिरवणुकांना विलंब झाला. 

जळगाव जिल्ह्यात किरकोळ अपवाद वगळता गणेश विसर्जन (Ganesh Visarjan 2022) मिरवणूक शांततेत पार पडली होती. मात्र, दुसरीकडे शहरात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महापौरांच्या घरावर हल्ला केल्याचा प्रकार घडला. यामुळं या भागात मोठा तणाव पाहायला मिळाला होता. महापौरांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात 43 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

जळगाव शहरात मेहरुन परिसरात महापौर जयश्री महाजन यांचे निवासस्थान आहे. याच परिसरात स्थापन करण्यात आलेल्या एका गणपती मंडळाची मिरवणूक महापौर जयश्री महाजन यांच्या घरा समोरुन जात होती. यावेली काही कार्यकर्त्यांनी महापौर जयश्री महाजन यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर गुलाल फेकल्याचे त्यांच्या परिवाराच्या लक्षात येताच परिवारातील महिला सदस्यांनी गुलाल उधळण्यास विरोध केला होता. याचवेळी काही संतप्त कार्यकर्त्यांकडून महापौर महाजन यांच्या परिवारातील सदस्यांना मारहाण करण्यात आल्याचा आणि घरावर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप जयश्री महाजन यांनी केला. 

महत्त्वाच्या बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here