मुंबई : याकूब मेमनच्या कबरीच्या सजावटीचं प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एक नवं प्रकरण समोर आलंय. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी याकूब मेमनचा नातेवाईक रऊफ मेमनसोबत एक बैठक घेतली असल्याचा आरोप करत संबंधित बैठकीचा व्हिडीओ भाजपने जारी केलाय. ज्या याकूब मेमनने १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात शेकडो मुंबईकरांना रक्तबंबाळ केलं, त्याच्या नातेवाईकासोबत किशोरी पेडणेकर बैठक कशा घेऊ शकतात? असा सवाल करत मविआ नेत्यांचे आणि मेमनच्या कुटुंबियांच्या संबंधांची पोलिसांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत भारतीय जनता पक्षाने केली आहे. दुसरीकडे भाजपने केलेले आरोप फेटाळत महापौर असताना धार्मिक स्थळांच्या तक्रारी ऐकण्यासाठी मी गेले होते. बैठकीला कोण कोण होते, याची मला कल्पना नाही. मात्र आम्हाला बदनाम करण्याचं षडयंत्र आखलं जातंय, असा पलटवार किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

मुंबईतील बॉम्बस्फोटातील दोषींपैकी फाशी झालेल्या याकुब मेमन (Yakub Memon) याची कबर चक्क लायटिंग आणि संगमरवर फरशीने सजवण्यात आली असल्याची माहिती २ दिवसांपूर्वी समोर आली. यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार सामना रंगला. मविआ सरकारच्या काळातच कबरीवर लायटिंग लावली असल्याचा आरोप करत तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली. तर हे सगळे आरोप फेटाळून लावत याकूबला फाशी दिल्यानंतर त्याचा मृतदेह कुटुंबियांना दिलातच का? तो समुद्रात का दफन केला नाही? असा प्रतिसवाल शिवसेनेने भाजपला विचारला. आज भाजपने एक पाऊल पुढे टाकत पेडणेकरांनी रऊफ सोबत बैठक घेतल्याचा व्हिडीओच जारी केला आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

किशोरी पेडणेकर महापौर असताना रऊफ मेमनसोबत बडा कब्रस्तानमध्ये ही बैठक झाल्याचा भाजपचा आरोप आहे. पेडणेकरांसोबत जवळपास २० ते २५ लोक बैठकीला उपस्थित असल्याचं व्हिडीओतून दिसून येतंय. रऊफने तोंडाला मास्क लावलाय. पेडणेकर आणि रऊफ यांच्यात काहीतरी गंभीर विषयांवर चर्चा सुरु असल्याचं दिसून येतंय. यावेळी पेडणेकरांसोबत पालिकेचे अधिकारीही उपस्थित असल्याचं व्हिडीओमध्ये प्रथमदर्शनी दिसतंय.

याकूब मेमनच्या कबरीची सजावट; फोटो ट्विट करत भाजपचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
पेडणेकरांनी आरोप फेटाळले

“महापौर असताना धार्मिक स्थळांच्या तक्रारी ऐकण्यासाठी मी गेले होते, बैठकीला कोण कोण होते, याची मला कल्पना नाही. एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय स्त्रींवर आरोप करुन भाजपला काय मिळतं. आम्हाला सातत्याने टार्गेट करण्याचा हा प्रयत्न सुरु आहे. आमचा गुन्हेगारांशी संबंध असण्याचा प्रश्नच नाही. मात्र वारंवार कुठल्या ना कुठल्या प्रकरणावरुन आमच्यालर आरोप करुन आमचं संयमी नेतृत्व कसं भडकेल, याची वाट भाजप पाहत आहे”.

याकूब मेमनच्या कबरीचा वाद भाजपमधील अंतर्गत संघर्षामुळे उफाळून आलाय: आदित्य ठाकरे
माझ्या नेत्याने मला तेथील पाहणी करण्यास सांगितलं. मग बैठकीत कोण कोण उपस्थित आहे, याची मी काय माहिती घेत बसू का? तिथे बैठकीला कोण कोण होतं, याची मला माहिती नाही. पण वडाला पिंपळाची साल लावण्याचा हा प्रकार असल्याचं सांगत किशोरी पेडणेतरांनी भाजपने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here