टिकेकर वाडी येथील विहिरीत विजय बुडाला
सोलापूर शहरातील हतुरे वस्ती येथे विजय आपल्या मित्रांसोबत विश्वविनायक हरी ओम गणेश मंडळ स्थापन केले होते. गेल्या दोन वर्षांपासून करोना महामारीचे निर्बंध असल्याने गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती. यंदा मात्र सर्व निर्बंध शिथिल झाल्याने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता. विजय हा या गणेश मंडळाचा अध्यक्ष होता. काल रात्री दहाच्या सुमारास टिकेकरवाडी येथील एका विहिरीत विजय आपल्या मंडळासोबत मिरवणूक काढत गणेश विसर्जनासाठी गेला होता. गणेश मूर्ती घेऊन विहिरीत गेला आणि मूर्तीसोबत विजय देखील बुडाला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्यात आला पण विजय सापडला नाही. पहाटेच्या सुमारास जीवरक्षक व पोलिसांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
विजयचा चार वर्षीय मुलगा पोरका
विजय हा महावितरणध्ये गेल्या १० वर्षांपासून तंत्रज्ञ म्हणून नोकरीस होता. सोलापूर शहरातील गुरुनानक चौक येथील कार्यालयात त्याची नियुक्ती होती. त्याने पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. पत्नी, एक मुलगा, दोन भाऊ, आई-वडील असा परिवार होता. कौटुंबिक वादातून पत्नीने दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. तेव्हापासून विजय मानसिक तणावात होता. पण चार वर्षीय मुलाने विजयचे सर्व मानसिक ताण हलके केले होते. गेल्या दोन वर्षांपासून विजय आई वडील व मुलगा हतुरे वस्ती येथे राहत होते. ड्युटी करून मुलाचा सांभाळ करण्यात तो नेहमी व्यस्त असायचा. पण गणेश विसर्जनादरम्यान विजयचा मृत्यू झाल्याने चार वर्षीय मुलगा पोरका झाला. आता या मुलाचा सांभाळ कसा आणि कोण करणार असा प्रश्न पडला आहे. त्याचा मृतदेह घरी आल्यावर हतुरे वस्तीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चार वर्षीय मुलाला पाहून सर्व नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.
टिकेकर वाडीमधील ती विहीर शापितचं
हतुरे वस्ती परिसरातील ती विहीर शापित असल्याची माहिती नागरिक देत होते. या विहिरीत नेहमी कोणीतरी आत्महत्या करत आहेत. स्थानिक प्रशासनाने विहीर बंद करावी अशी मागणी करत आहेत. कारण ज्यावेळी विजय विहिरीत बुडाला तो आतील गाळमध्ये अडकला होता. त्याच्या मृतदेहासोबत गाळ, पाला पाचोळा मोठ्या प्रमाणात बाहेर आला होता. विजयच्या मृत्यूची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली आहे.
भक्तांचा जनसागर…सात माणसांचा थर होईल इतक्या खोलवर लालबाग राजाचं विसर्जन