याकूब मेमनच्या कबरीच्या सजावटीचं प्रकरण ताजं असतानाच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी याकुब मेमनचा नातेवाईक रऊफ मेमनसोबत एक बैठक घेतली असल्याचा आरोप करत संबंधित बैठकीचा व्हिडीओ भाजपने जारी केला. ज्या याकुब मेमनने १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात शेकडो जणांना रक्तबंबाळ केलं, त्याच्या नातेवाईकासोबत किशोरी पेडणेकर बैठक कशा घेऊ शकतात? असा सवाल करत मविआ नेत्यांचे आणि मेमनच्या कुटुंबियांच्या संबंधांची पोलिसांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत भारतीय जनता पक्षाने केली. यानंतर किशोरी पेडणेकरांनी आक्रमक पवित्रा घेत भाजप नेत्यांनी केलेल्या आरोपांचं खंडन करत भर पत्रकार परिषदेत मेमनचे फडणवीस आणि कोश्यारींसोबतचे फोटोच दाखवले.
“बडा कब्रस्तानच्या समोर पाणी भरलं असल्याने मी तिथे गेले होते. मी बडा कब्रस्तानमध्ये गेले असल्याचं नाकारलंच नाही. पण मी महापौर असताना माझ्या नेत्याने सांगितल्याने तिथे गेले होते. बैठकीला कोण कोण होते, याची मला कल्पना नाही. एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय स्त्रींवर आरोप करुन भाजपला काय मिळतं. आम्हाला सातत्याने टार्गेट करण्याचा हा प्रयत्न सुरु आहे. आमचा गुन्हेगारांशी संबंध असण्याचा प्रश्नच नाही. मात्र वारंवार कुठल्या ना कुठल्या प्रकरणावरुन आमच्यालर आरोप करुन आमचं संयमी नेतृत्व कसं भडकेल, याची वाट भाजप पाहत आहे. माझ्या नेत्याने मला तेथील पाहणी करण्यास सांगितलं. मग बैठकीत कोण कोण उपस्थित आहे, याची मी काय माहिती घेत बसू का? तिथे बैठकीला कोण कोण होतं, याची मला माहिती नाही. पण वडाला पिंपळाची साल लावण्याचा हा प्रकार आहे”, असं म्हणत किशोरी पेडणेकरांनी भाजपने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.
आरोप कसले करता, मी माझ्या कामाने मोठी झाले
“बारा तोंडं फक्त आरोप करण्यासाठी बसवली आहेत. एका मध्यमवर्गीय महिलेला तरी सोडा. मी कामाने मोठी झाले हो, मी नाही तुमच्यासारखे छक्के पंजे खेळले, माझ्या कामावर तुम्हाला आक्षेप असेल तर मला सांगा, पण हे काय घेऊन बसता, हे फोटो कोणीही काढतं. कोश्यारी किती होशियारी.. माझ्यावर ऑब्जेक्शन घेता? एका स्त्रीवर? राजकारणातील स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक म्हणून पण नाही का सोडणार? सत्ता जरुर मिळवा, पण काम करुन मिळवा, विश्वासार्हता जपून मिळवा, जी शिवसेना, बाळासाहेबांनी मिळवली”, असं पेडणेकर म्हणाल्या.
भाजपने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये नेमकं काय?
किशोरी पेडणेकर महापौर असताना रऊफ मेमनसोबत बडा कब्रस्तानमध्ये ही बैठक झाल्याचा भाजपचा आरोप आहे. पेडणेकरांसोबत जवळपास २० ते २५ लोक बैठकीला उपस्थित असल्याचं व्हिडीओतून दिसून येतंय. रऊफने तोंडाला मास्क लावलाय. पेडणेकर आणि रऊफ यांच्यात काहीतरी गंभीर विषयांवर चर्चा सुरु असल्याचं दिसून येतंय. यावेळी पेडणेकरांसोबत पालिकेचे अधिकारीही उपस्थित असल्याचं व्हिडीओमध्ये प्रथमदर्शनी दिसतंय.