धक्कादायक बाब म्हणजे मृत सरपंच बारकाबाई यांचे ३५ वर्षीय जावई सुभाष टिकाराम वाघ हे घरात झोपलेले असताना त्यांनाही ५ सप्टेंबर रोजी पहाटेच्या ४ वाजताच्या सुमारास या पाड्यातील विषारी सापाने दंश केला. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी सुभाष वाघ यांना टोकावडे येथील शासकीय रुग्णालयात झोळीतून नेले. मात्र त्यांच्यावरही उपचार करण्यास उशीर झाल्याने अंगात विष भिनल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. केवळ अपुऱ्या सोयी-सुविधा आणि रस्त्यांचा अभावामुळे सासू आणि जावयाचा बळी गेल्याची खंत कुटुंबप्रमु़ख किसन राजाराम हिलम यांनी व्यक्त केली आहे. जर या वाडीत येण्या-जाण्यासाठी रस्ता असता तर सरपंच असलेल्या माझ्या पत्नीचा व जावयाचा प्राण वाचला असता असंही त्यांनी सांगितलं. तसंच रस्त्याअभावी आणखी बळी जाण्याची वाट न पाहता शासनाने आता तरी आमच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आदिवासी पाड्यातील कुटुंबांनी केली आहे.
रस्ता तर नाहीच, शिवाय ५० ते ६० गावात स्मशानभूमीही नाही
उन्हाळ्यात बहुतांश आदिवासी पाड्यांना रस्त्याची अडचण भासत नसली तरी, मात्र पावसाळ्यात ओढ्यातून तर कधी चि़खलयुक्त पायवाटेतून मार्ग काढीत विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागते. तसंच रुग्णांना झोळीचा आधार घेत रुग्णालयात न्यावे लागते. मुरबाड तालुक्यातील ६० ते ६५ आदिवासी पाड्यांना आजही रस्ता तर नाहीच, शिवाय तालुक्यातील ५० ते ६० गावात स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांना मृतदेहांवर उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.